नांदेडच्या कर्मचाऱ्याची घोड्याची मागणी; अख्ख्या महाराष्ट्राला हसू अनावर
बातमी मराठवाडा

नांदेडच्या कर्मचाऱ्याची घोड्याची मागणी; अख्ख्या महाराष्ट्राला हसू अनावर

नांदेड : मला मणक्याचा त्रास आहे. कार्यालयात गाडीवर येत असल्याने तो त्रास अजून वाढत आहे. त्यामुळे मला घोड्यावरुन कार्यालयात येण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने केली. या कर्मचाऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांना तसं पत्रच दिलं. हे पत्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. महत्वाची बाब म्हणजे अनेक सरकारी कार्यालयात सध्या ही मागणी करणाऱ्या पत्राचीच चर्चा ऐकायला मिळत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक लेखाधिकारी असलेले सतीष पंजाबराव देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना हे पत्र लिहिलं आहे. मी सतिष पंजाबराव देशमुख, सहाय्यक लेखाधिकारी (रोहयो विभाग) जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड इथं कार्यारत आहे. मला पाठीच्या कण्याचा त्रास होत असल्यामुळे टु व्हिलरवर येण्यास त्रास होत आहे. त्यामुळे मी घोडा खरेदी करण्याचे ठरवले आहे. घोड्यावरुन बसून विहीत वेळेत कार्यालयामध्ये येणे मला शक्य होईल व घोडा आणल्यास त्याला बांधण्यासाठी कार्यालयीन परिसरात घोडा बांधण्यासाठी परवानगी देण्यात यावी, हि विनंती, असं पत्र नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना लिहिण्यात आलं होतं.

हे पत्र सोशल मीडियावर चांगलच व्हायरल झाल्यानंतर जिल्हाधिकारी महोदयांनाही या पत्राची दखल घेतली. या मागणीवर उत्तर शोधण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाचीच मदत घेतली. संबंधित विषय डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी, नांदेड यांना कळवला. मग वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनीही संबंधित विषय जाणून घेतला आणि जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र पाठवलं.

डॉक्टरांनी पाठवलेले पत्र
सतिष पंजाबराव देशमुख यांना पाठीचा त्रास होत असल्याने दुचाकीवर येण्यास त्रास होत आहे. त्यामुळे त्यांनी घोडा खरेदी करुन घोड्यावर बसून कार्यालयात येण्याची व कार्यालय परिसरात घोडा बांधण्याची परवानगी देण्यासंबंधी विनंती अर्ज केलेला आहे. त्या अनुषंगाने संदर्भ क्र. 3 अन्वये विभागप्रमुख अस्थिव्यंगोपचारशास्त्र यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार पाठीच्या कण्याचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी घोड्यावर प्रवास केल्यास आणखीन आदळआपट होते. त्यामुळे मणका दबण्याची आणि मणक्यामधील गादी दबण्याची तसेच सरकण्याची संभावना असते. त्यामुळे पाठीच्या कण्याचा आजार कमी न होता वाढण्याची दाट शक्यता आहे. करीता आपल्या माहिती व योग्य कार्यवाहीस्तव सादर, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांना कळवली. वरील सर्व प्रकारामुळे सरकारी कामकाजाचा प्रत्यय पुन्हा एकदा सर्वसामान्य नागरिकांना येत आहे. तसंच या संपूर्ण प्रकारामुळे लोकांची आयती करमणूकही होत आहे.