कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण विभागाचा मोठा निर्णय
बातमी महाराष्ट्र

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण विभागाचा मोठा निर्णय

मुंबई : कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील जलसंधारण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जलसंधारण विभागाने सकाळी आठ ते दुपारी चार आणि दुपारी बारा ते रात्री आठ अशी शिफ्ट मध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यामध्ये विभागातील कर्मचाऱ्यांना वाटून शिफ्ट देण्यात आल्या आहेत. यामध्ये एका कर्मचाऱ्याला वर्क फ्रॉम होम करण्याची देखील मुभा देण्यात आली आहे.  विशेष म्हणजे एकाचवेळी अनेक कर्मचारी असण्यापेक्षा दोन शिफ्ट मध्ये कर्मचारी विभागून जलसंधारण विभागाने एक प्रयत्न केला आहे.

एकीकडे कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. काही जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत ही कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. तर राज्याचा कारभार ज्या मंत्रालयात चालतो त्या मंत्रालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लोकल ट्रेन, बस मधून प्रवास करावा लागतो. त्या गर्दीत ही कोरोना धोका कायम आहे. त्यामुळे मंत्रालयातील अनेक मंत्री, कर्मचारी देखील कोरोनाबाधित झाले आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील जलसंधारण विभागाने दोन शिफ्टमध्ये कामकाज करण्याचा निर्णय घेतला आहे.

सोमवारपासून (ता. १५) पासून या दोन शिफ्ट मध्ये कामकाज सुरु होणार आहे. यामुळे कामावर काही परिणाम होतो का हे देखील पाहावं लागणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील कार्यालयीन कामकाजाच्या वेळा बदलून काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पण मंत्रालयात पहिल्यांदाच अशा पद्धतीने शिफ्ट मध्ये काम करण्यात येणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर इतर विभागातही शिफ्ट मध्ये काम करता येईल का, यावर विचार करण्यात येणार आहे.

कोरोना काळात कामचं स्वरूप आणि कामाच्या पद्धती बदलल्या आहेत. खासगी क्षेत्रात शिफ्ट मध्ये काम केले जाते. पण सरकारी कार्यालयात जिथे नेहमी कार्यालयीन कामकाजवर टीका होते तिथे देखील हा नवीन प्रयोग होत असल्याचे चित्र दिसत आहे.