”तुम्हाला केवळ तुमच्या राजकारणाची काळजी होती, मराठ्यांची नाही”
राजकारण

”तुम्हाला केवळ तुमच्या राजकारणाची काळजी होती, मराठ्यांची नाही”

मुंबई : “१५ वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार राज्यात होते. मात्र तुम्हाला केवळ तुमच्या राजकारणाची काळजी होती, मराठ्यांची नाही. मराठा समाजाची मते हक्काने घ्यायची, पण त्यांना आहे तसेच राहू द्यायचे. हेच तुमचे धोरण होते,” अशा शब्दात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी-काँग्रेसवर टीकास्त्र डागलं आहे. मराठा आरक्षणाची पुढील सुनावणी आता 15 ते 17 मार्च दरम्यान होणार आहे. मराठा आरक्षणसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान सर्व राज्यांना नोटीस पाठवण्याची महाराष्ट्र सरकारनं केलेली विनंती मान्य करण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मात्र, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरणही तापताना दिसत आहे. मराठा आरक्षण याचिकांवर पुन्हा एकदा सुनावणी सुरू झाल्यानंतर राज्यात हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चंद्रकांत पाटील यांनी याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भूमिकेवर पाटील यांनी ट्विट करून निशाणा साधला आहे.

एका पाठोपाठ त्यांनी तीन ट्वीट करत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस वर निशाणा साधला आहे.
“तुम्हा प्रस्थापितांना गरीब मराठ्यांना कधी आरक्षण द्यायचेच नव्हते. १५ वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार राज्यात होते. मात्र तुम्हाला केवळ तुमच्या राजकारणाची काळजी होती, मराठ्यांची नाही. मराठा समाजाची मते हक्काने घ्यायची, पण त्यांना आहे तसेच राहू द्यायचे. हेच तुमचे धोरण होते. मराठा समाजाच्या नावाने राष्ट्रवादी-काँग्रेसने महाराष्ट्रात एवढी वर्ष राजकारण केलं. पण मराठा समाज कधीही आपल्या पुढे जाणार याचीच खबरदारी राष्ट्रवादी-काँगेस पक्षाने आजपर्यंत घेतली!,” असं पाटील यांनी म्हटलं आहे.

पुढील ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, “अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाची प्रलंबित असणारी मागणी भाजपा सरकारने निकराचा लढा देऊन पूर्ण केली. मराठा समाजाला उद्भवणाऱ्या अडचणी पाहता मराठा समाजाला आरक्षण मिळणे हे अत्यंत गरजेचे आहे. पण महाविकास आघाडी सरकारने सत्तेत येताच मराठा आरक्षणाचा खेळ खंडोबा केला!,” असा आरोप केलेला आहे.

तर तिसऱ्या ट्विटमध्ये “भाजपा सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले आणि ते न्यायालयात भक्कमरित्या टिकवलं सुद्धा पण या लबाड सरकारने मराठा समाजासाठी काय केलं ते सांगावं! सत्तांतर झाल्यानंतर भाजपा सरकारने मराठा आरक्षणासाठी कायदा केला. राज्य मागासवर्ग आयोगाचं गठन केलं. त्या आयोगाचा अहवाल आला, त्यात मराठा समाजासाठी आरक्षणाची शिफारस मिळाली. हा कायदा हायकोर्टात टिकवला. तो टिकण्यासारखाच भक्कम बनवला. पण तुम्ही मराठा समाजासाठी काय केलं?,” असं सवाल चंद्रकांत पाटलांनी महाविकास आघाडी सरकारला केला आहे.