मोठी बातमी : वाढदिवसाच्या दिवशीच मिथुन यांची पोलिसांकडून चौकशी
देश बातमी

मोठी बातमी : वाढदिवसाच्या दिवशीच मिथुन यांची पोलिसांकडून चौकशी

कोलकाता : भाजप नेते आणि अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची आज त्यांच्या वाढदिवसादिवशीच पश्चिम बंगाल पोलिसांनी चौकशी केली आहे. मिथुन यांची ऑनलाईन चौकशी करण्यात आली. त्यांच्यावर ७ मार्च रोजी पक्षात सामील झाल्यानंतर वादग्रस्त भाषण केल्याचा आरोप आहे. यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये म्हटलं आहे की, हे भाषणच बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा विजय झाल्यानंतर जो हिंसाचार झाला, त्याला कारणीभूत ठरलं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मिथुन चक्रवर्ती यांनी ही एफआयआर रद्द करण्यासाठी कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने चौकशीसाठी एका विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक करुन त्याला चौकशीचे आदेश दिले. मिथुन यांनी स्पष्ट केलं आहे की, त्यांनी या भाषणादरम्यान केवळ चित्रपटातल्या डायलॉग्जचा वापर केला होता, त्यातलं काहीही हेतुपुरस्सर बोललेलं नव्हतं.

मिथुन चक्रवर्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आलेल्या कोलकातातील ब्रिगेड मैदानातील व्यासपीठावर ७ मार्च रोजी भाजपात प्रवेश केला. यावेळी बोलताना मिथुन चक्रवर्ती म्हणाले, मी कोब्रा आहे. कुणी जर हिसकावून घेत असेल, तर मी उभा राहीन. माझा एक दंश पुरेसा आहे. मी बंगाली आहे आणि जो कुणी इथे वाढला आहे, त्याचा भूमीवर अधिकार आहे. मी ग्वाही देतो की, पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाच्या हक्कासाठी मी लढेन.