मुकेश अंबानी स्फोटक प्रकरण: घराबाहेर स्फोटकं ठेवणारा संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
देश बातमी

मुकेश अंबानी स्फोटक प्रकरण: घराबाहेर स्फोटकं ठेवणारा संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली जीप आढळल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास एटीएस करत असून नुकताच तपासात मोठा खुलासा झाला आहे. एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाच्या परिसरात दिसलेल्या इनोव्हा गाडीचा ड्रायव्हर पुन्हा अँटिलिया परिसरात आला होता. आपली ओळख लपवण्यासाठी त्याने पीपीई किट घातलं होतं. या भागात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा संशयित आरोपी कैद झाला आहे. परंतु पीपीई किट घातलं असल्याने त्याची ओळख पटलेली नाही.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इनोव्हा गाडीच्या चालकाने गाडीचा नंबर पुन्हा बदलला होता. पहाटे साडेचारच्या सुमारास मुलुंड टोल ओलांडून इनोव्हा पुन्हा मुंबईत आली. त्यानंतर इनोव्हा गाडीचा ड्रायव्हर पहाटे 4 वाजून 35 मिनिटांनी स्कॉर्पिओ गाडी पार्क केलेल्या ठिकाणी पोहोचला. संशयिताने स्कॉर्पिओ गाडीची तपासणी केली आणि मग निघून गेला आणि त्यानंतर पहाटे 5 वाजून 18 मिनिटांनी त्याने पुन्हा मुलुंड टोल नाका ओलांडला. आरोपीने आपली ओळख लपवण्यासाठी पीपीई किट घातला होता आणि पीपीई किट घालून तो इनोव्हा गाडी चालवत होता.

दरम्यान, भारतातील श्रीमंत उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली जीप आढळल्याने खळबळ उडाली होती. मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाजवळ जिलेटिनचा साठा सापडला. संशयिताने मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानापासून 500 मीटर अंतरावर स्कॉर्पिओमध्ये 20 जिलेटिनच्या कांड्या ठेवल्या होत्या. मुंबई पोलीस, फॉरेन्सिक टीम, आणि श्वानपथकांनी तपास सुरु केल्यानंतर यात स्फोटकांसह एक चिठ्ठीही सापडली असून त्यामधून घातपाताची धमकीचे पत्रही सापडले होते.

त्यानंतर स्कॉर्पिओचा चालक इनोव्हा गाडीतून पळून गेला होता. स्कॉर्पिओ गाडीच्या चालकाला मुलुंड टोल नाका पार केल्यावर पुन्हा एकदा अँटिलिया येथे पाहण्यात आलं. रात्री 3 वाजून 05 मिनिटांना इनोव्हा गाडी मुंलुड टोल नाका पार करताना दिसली होती. त्यानंतर पुन्हा अँटिलिया येथे दिसून आली. पोलीस आणि तपास यंत्रणांकडून सीसीटीव्ही फूटेज तपासण्याचं काम सुरु आहे.