नागपूरात परिस्थिती हाताबाहेर; कोरोनाबळींची वाढली संख्या
बातमी विदर्भ

नागपूरात परिस्थिती हाताबाहेर; कोरोनाबळींची वाढली संख्या

नागपूर : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेला असताना नागपूर जिल्ह्यात कोरोनामुळे परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे पाहायला मिळत आहे. नागपुरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत वाढ झाली असून एका दिवसांत आतापर्यंतच्या सर्वाधिक ११३ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. यातील ७५ मृत्यू केवळ नागपूर शहरात झाले आहेत. त्यामुळे एकूणच परिस्थिती हाताबाहेर गेली असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, आणखी ६ हजार ३८६ बाधितांची आज भर पडली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूचे वाढते प्रमाण रोखण्यात आरोग्ययंत्रणेला अपयश आले असल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून दररोज जिल्ह्यात ५० हून अधिक मृत्यूची नोंद करण्यात येत आहे. गेल्या १९ दिवसांत जिल्ह्यात बाराशेहून अधिक मृत्यू नोंदवण्यात आले. सोमवारी जिल्ह्यात पहिल्यांदाच मृत्यूच्या आकड्याने शंभरी पार केली.

शहरात ७५, तर ग्रामीणमध्ये ३२ आणि जिल्ह्याबाहेरील ६ रुग्णांच्या मृत्यूचा समावेश आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या मृत्युसत्रामुळे आतापर्यंत तब्बल ६ हजार ३८६ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. दुसरीकडे रुग्णवाढीचा आकडाही कायम आहे. दिवसभरात जिल्ह्यात ६ हजार ३६४ नव्या करोना बाधितांची नोंद करण्यात आली. यात ४ हजार ५७८ शहरात, तर १ हजार ७८० ग्रामीणमध्ये नोंदवण्यात आले. आतापर्यंत जिल्ह्यातील बाधितांचा आकडा ३ लाख २९ हजार ४७०पर्यंत पोहोचला आहे. दुसरीकडे, जिल्ह्यात आज ५ हजार ९७ रुग्ण बरे होऊन घरी परतले.