मोठी बातमी! नारायण राणेंना विजेचा शॉक
कोकण बातमी

मोठी बातमी! नारायण राणेंना विजेचा शॉक

कणकवली: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जन आशीर्वाद यात्रेदरम्यान एके ठिकाणी हाताला विजेचा शॉक लागला. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. रत्नागिरीतून जन आशीर्वाद यात्रा पुन्हा सुरू केल्यानंतर केंद्रीय मंत्री राणे आज सिंधुदर्गातील कणकवली येथे दाखल झाले. तेथे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर ते तेथून निघत होते. आसपास मोठी गर्दी होती. छत्रपतींच्या पुतळ्याला असलेल्या रेलिंगवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. त्यातील एका लोखंडी रेलिंगवर राणे यांनी आधारासाठी हात ठेवला आणि त्यांना एकच शॉक बसला. राणे यांनी तातडीने हात झटकून काढून घेतला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नारायण राणे यांना ज्यावेळी विजेचा शॉक लागला, त्या वेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे सोबत होते. त्यांनी राणे यांना शॉक लागल्याचे पाहिले आणि तेही सावध झाले. त्यांना आजूबाजूच्या कार्यकर्त्यांना तत्काळ सावध होण्यास सांगितले. या घटनेनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रेलिंगवर करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले.

या यात्रेदरम्यान नारायण राणे यांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा फोनही आला. राजनाथ सिंह यांनी राणे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यावेळी राणे यांनी आपल्या तब्येतीची माहिती दिली. माझी तब्येत उत्तम असून मी रुग्णालयात वैगेरे दाखल झालो नाही, घरीच होतो. माझी तब्येत बिघडली अशी त्यांनी हवा पसरवली अशी माहिती दिली.