शेतकरी आंदोलन : पंजाब-हरियाणातील पंचायतींचा पुढाकार, घरातून एकला दिल्लीला पाठवण्याचे आवाहन
देश

शेतकरी आंदोलन : पंजाब-हरियाणातील पंचायतींचा पुढाकार, घरातून एकला दिल्लीला पाठवण्याचे आवाहन

नवी दिल्ली- केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी लागू केलेल्या जाचक कायद्यांविरोधात शेतकरी आक्रमक झाले असून राजधानी दिल्लीत मोठ्या स्वरुपाचे आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे. या आंदोलनासाठी पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांसह आता तेथील पंचायती देखील समोर आल्या आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

प्रत्येक घरातील एक व्यक्ती आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीला जाईल, असा निरोप पंजाब व हरियाणाच्या पंचायतींतून दिला जात आहे, असा दावा सोमवारी शेतकरी संघटनांनी केला.

नव्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी राजधानी दिल्लीच्या वेशीवर जमलेले आंदोलक शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात सोमवारी तोडग्याची कोणतीही चिन्हे आढळून आली नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी दौऱ्यात नवीन कृषी कायदे ऐतिहासिक असल्याचे स्पष्ट केले.तर आंदोलक शेतकऱ्यांच्या नेत्यांनी निर्णायक लढ्यासाठी आम्ही दिल्लीत जमलो असून पंतप्रधानांनी आता आमची मन की बात ऐकावी, असे आवाहन केले. त्यामुळे शेतकरी आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आम्हाला आंदोलनाला फूस लावलेली नाही. हे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी फोन करून शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलावले. पण आधी बुराडीत रोखलेल्या शेतकऱ्यांना सिंधू सीमेवर येऊ द्या, अशी अट योगेंद्र यादव यांनी ठेवली आहे.