शत्रूचे तळ काही सेकंदात नष्ट करू शकतो ड्रोन स्वार्म; पहा युद्धाचे नवे तंत्रज्ञान
देश बातमी

शत्रूचे तळ काही सेकंदात नष्ट करू शकतो ड्रोन स्वार्म; पहा युद्धाचे नवे तंत्रज्ञान

सैन्य दिना’च्या निमित्ताने भारतीय लष्कराने शुक्रवारी (ता.१५) ड्रोन स्वार्म (थव्याच्या स्वरुपात) तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक दाखवले. ड्रोन स्वार्म म्हणजे झुंडीच्या स्वरुपात पाठवलेली ड्रोन्स. ही ड्रोन्स शत्रूचे हवाई सुरक्षा कवच नष्ट करु शकतात. भविष्यात आक्रमक लष्करी कारवाईसाठी ड्रोन स्वार्म टेक्नोलॉजीचा वापर करु शकतो, हे भारताने शुक्रवारी पहिल्यांदाच दाखवून दिले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

येत्या काळात युद्धाचे बदलणारे तंत्रज्ञान लक्षात घेता भारतीय सैन्यदेखील त्या आधारावर स्वत: ची तयारी करत आहे. याची काही झलक लष्कराच्या दिवशी पाहायला मिळाली. सैन्य दिनानिमित्त राजधानी दिल्ली येथे परेडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, पहिल्यांदाच ड्रोन स्वार्म तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. जेव्हा या ड्रोन्सने आकाशात उड्डाण केले तेव्हा ते पक्ष्यांच्या थाव्याप्रमाणे दिसत होते.

भारतीय लष्कराचे हे लढाऊ ड्रोन शत्रूंना प्रत्युत्तर देण्यात आणि त्यांची लक्ष्य यशस्वीपणे नष्ट करण्यास सक्षम आहेत. हे स्वयंचलित ड्रोन्स मानवी हस्तक्षेपाशिवाय शत्रूच्या प्रदेशात ५० किलोमीटर आतपर्यंत घुसून लक्ष्यभेद करु शकतात तसेच या ड्रोन्सचे संचालन करणाराही पूर्णपणे सुरक्षित असेल, असे या तंत्रज्ञानाबद्दल माहिती देणाऱ्या प्रेजेंटरने सांगितले.

दिल्ली कॅन्टॉनमेंटमध्ये शुक्रवारी ‘आर्मी डे’ परडेच्या निमित्ताने ड्रोन स्वार्म टेक्नोलॉजी दाखवण्यात आली. यावेळी ७५ छोटया आणि मध्यम आकाराच्या ड्रोन्सचा वापर करण्यात आला. ड्रोन स्वार्म हे भविष्यातील युद्धाचे अत्यंत अचूक आणि घातक शस्त्र आहे. ड्रोन स्वार्म तंत्राने तुम्ही शत्रूचे रणगाडे, रडार, हेलिपॅड, इंधन डेपो आणि दहशतवादी तळ नष्ट करु शकतात. भारतीय सैन्याने सुद्धा आता या युद्ध कलेत स्वत:ला पारंगत केले आहे. इतकेच नव्हे तर, हल्ल्याच्या बरोबरीने मानवी हस्तक्षेपाशिवाय सीमेवरील जवानांना आवश्यक मदत साहित्य सुद्धा ड्रोन स्वार्मने पोहोचवता येऊ शकते.

मागच्यावर्षी झालेल्या आर्मेनिया आणि अझरबैझानमधील युद्धात ड्रोन विमानांचे हल्ले निर्णायक ठरले होते. सीमेवर भारतासमोर आव्हान निर्माण करणाऱ्या चीनकडे सशस्त्र ड्रोन्स आहेत. हे तंत्रज्ञान ते आता पाकिस्तानालही देणार आहेत. त्यामुळे भारताने आता ‘चीता’ प्रकल्पाला गती दिली आहे. या प्रकल्पातंर्गत इस्रायली बनावटीच्या हेरॉन ड्रोन्सना लेझर गाइडेड बॉम्बने सुसज्ज करण्यात येणार आहे.