दुर्दैवी! महाराष्ट्रातील ऑक्सिजन संशोधकाचाच ऑक्सिजनअभावी मृत्यू
देश बातमी

दुर्दैवी! महाराष्ट्रातील ऑक्सिजन संशोधकाचाच ऑक्सिजनअभावी मृत्यू

चेन्नई : गेल्या महिनाभरात देशात निर्माण झालेला ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेकांना प्राणाला मुकावे लागत असताना ऑक्सिजनअभावी चेन्नईमध्ये मूळचे महाराष्ट्राचे असणारे डॉ. भालचंद्र काकडे यांचं निधन झालं आहे. डॉ. काकडे यांनी ऑक्सिजनवर मोठं संशोधन केलं होतं. त्यासंदर्भात त्यांच्या नावावर ७ पेटंट देखील होते. मात्र, त्यांचंच ऑक्सिजनअभावी निधन झाल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातून देखील हळहळ व्यक्त होताना दिसत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

डॉ. काकडे यांच्या लॅबमधील काही इतर सहकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर डॉ. काकडे यांचे अहवाल देखील पॉझिटिव्ह आले. ४४ वर्षीय डॉ. काकडे यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना कृत्रिम ऑक्सिजनची गरज भासू लागली. शेवटच्या काही दिवसांत त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यांच्या प्रकृतीत काही प्रमाणात सुधाराणा देखी होऊ लागली होती. मात्र, मंगळवारी रात्री रुग्णालयातला ऑक्सिजन पुरवठा संपला. यामध्ये प्राण गमवावे लागलेल्या १० रुग्णांमध्ये डॉ. काकडे यांचाही समावेश होता. आयुष्यभर ऑक्सिजनवर संशोधन करणारे डॉ. काकडे यांनाच शेवटच्या क्षणी ऑक्सिजन मिळू शकला नसल्याचे दुर्दैवी घटना घडल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

डॉ. काकडे यांनी ऑक्सिजन आणि हायड्रोजनच्या मदतीने निर्माण होणाऱ्या ऊर्जेवर रेल्वे चालवण्याचा प्रयोग त्यांनी यशस्वी करून दाखवला होता. डॉ. काकडे हे मूळचे कोल्हापूरचे होते. त्यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून रसायनशास्त्रातलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर पुण्याच्या एका लॅबमध्ये त्यांनी संशोधनाचं काम केलं. पुढे जपानच्या टोकियो इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये देखील ते काही काळ कार्यरत होते. चेन्नईच्या एसआरएम संशोधन संस्थेमध्ये ते वरीष्ठ संशोधक म्हणून रुजू होते.