३० जानेवारीला घेण्यात येणाऱ्या एल्गार परिषदेला पुणे पोलिसांची परवानगी
पुणे बातमी

३० जानेवारीला घेण्यात येणाऱ्या एल्गार परिषदेला पुणे पोलिसांची परवानगी

पुणे : पुणे पोलिसांनी येत्या ३० जानेवारीला घेण्यात येणाऱ्या एल्गार परिषदेला परवानगी दिली आहे. स्वारगेट येथील श्री गणेश क्रीडा कला मंच याठिकाणी एल्गार परिषद होणार आहे. कोरोनामुळे या परिषदेला केवळ 200 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. खरतरं ही एल्गार परिषद निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांना 31 डिसेंबर रोजी घ्यायची होती. परंतु, त्यावेळी मात्र या परिषदेसाठी पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतर तब्बल एक महिना उलटल्यानंतर पोलिसांकडून ही परवानगी देण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान, न्या. बी. जी. कोळसे पाटील यांनी एल्गार परिषदेच्या आयोजनाच्या परवानगीसाठी स्वारगेट पोलिसांकडे अर्ज केला होता. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणास्तव त्यावेळी पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे कोळसे पाटलांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता. पण अखेर पोलिसांनी एल्गार परिषदेला परवानगी दिली आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेता केवळ 200 व्यक्तींनाच पुणे पोलिसांकडून या परिषदेसाठी परवानी देण्यात आली आहे. त्याचसोबत कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही, याचीही खबरदारी आयोजकांना घ्यावी लागणार आहे, अशी अटही पुणे पोलिसांना घातली आहे.

दरम्यान, 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यातील शनिवार वाड्यावर एल्गार परिषद पार पडली होती. मात्र ही परिषद वादग्रस्त ठरली होती. या परिषदेच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच, 1 जानेवारी 2018 रोजी कोरेगाव भीमा येथे हिंसाचार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी एल्गार परिषदेचा संबंध कोरेगाव भीमा येथे घडलेल्या हिंसाचाराशी जोडला होता. तसेच देशभरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत याप्रकरणी अद्यापही तुरुंगात आहेत. याप्रकरणाचा तपास अद्याप सुरु आहे.

त्यामुळे अशी घटना पुन्हा घडू नये या पार्श्वभूमीवर पोलिसांनी 31 डिसेंबर रोजी या परिषदेला परवानगी नाकारल्याचं बोललं जात आहे. परंतु, आता 30 जानेवारीला ही परिषद घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आताही या परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.