राज्यसभेतून तृणमूल काँग्रेसच्या खासदाराचे निलंबन
देश बातमी

राज्यसभेतून तृणमूल काँग्रेसच्या खासदाराचे निलंबन

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार शांतनू सेन यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी शांतनू सेन यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. यामुळे शांतनू सेन अधिवेशनाला मुकणार आहेत. शांतनू सेन यांनी गुरुवारी केंद्रीय माहिती व तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव पेगॅसस प्रकरणावर निवेदन देत असताना त्यांच्या हातातून निवेदनपत्र खेचून घेत फाडलं होतं. त्यानंतर भाजपने शांतनू सेन यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्याची तयारी केली होती. दरम्यान व्यंकय्या नायडू यांनी शांतनू सेन यांचं निलंबन केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नेमकं काय घडलं?
पेगॅसस गुप्तहेर तंत्रज्ञानाच्या कथित हेरगिरी प्रकरणावरून राज्यसभेत गुरुवारी अभूतपूर्व गोंधळ झाला. केंद्रीय माहिती व तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या निवेदनाचे कागद हिसकावून घेऊन ते उपसभापतींच्या आसनाकडे भिरकावण्यात आले. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सभापतींच्या समोरील हौदात येऊन घोषणाबाजी केली. भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांमध्ये बाचाबाची झाल्यामुळे सुरक्षारक्षकांना मध्यस्थी करावी लागली. अशा प्रचंड गदारोळात मंत्र्यांचे निवेदन पूर्ण न होताच वरिष्ठ सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाले.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव हे पेगॅसस प्रकरणावर मंगळवारी राज्यसभेत स्पष्टीकरण देणार होते. पण, कोरोनावरील चर्चेमुळे ते गुरुवारी दोन वाजता केंद्र सरकारची भूमिका मांडणार असल्याची माहिती सभागृहाला देण्यात आली होती. सभागृहाचे कामकाज सुरू होताच पेगॅसस आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधकांनी घोषणाबाजी केल्याने सभापती व्यंकय्या नायडू यांनी सभागृह लगेचच तहकूब केले, त्यानंतर ते १२ वाजता दुसऱ्यांदा तहकूब झाले.