आमची बदनामी थांबवा नाहीतर आम्ही आत्महत्या करू; पूजा चव्हाणच्या आईचा इशारा
बातमी मराठवाडा

आमची बदनामी थांबवा नाहीतर आम्ही आत्महत्या करू; पूजा चव्हाणच्या आईचा इशारा

बीड : ”माझ्या मुलीचा मृत्यू झालाय, तिची बदनामी करू नये, माझी मुलगी कशी होती मला माहीत आहे. ती खूप टेन्शनमध्ये होती, तिने आत्महत्या का केली याबद्दल काहीच माहीत नाही. त्यामुळे आमची बदनामी थांबवा नाहीतर आम्ही आत्महत्या करू, असा इशारा पूजा चव्हाणच्या आई मंडूबाई चव्हाण यांनी दिला आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नवनवे खुलासे समोर येत असतानाच पूजाच्या आई आणि बहिणीनं एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी बोलताना पूजाच्या आई म्हणल्या की, ”मला आणखी पाच मुली आहेत, आम्ही सगळेच आत्महत्या करणार आहोत. पूजाने आम्हाला काहीच सांगितलं नाही. दोन ते चार दिवसांत येते आणि भेटून जाते, असं तिने सांगितलं. बाकी काहीच बोलली नाही, असा खुलासाही पूजाच्या आईनं केलाय. अरुण राठोडला आम्ही ओळखत नाही. फक्त नावच ऐकलं आहे. ती आमच्यासाठी मुलासारखीच होती. सर्व तिला राखी बांधत होते. सर्वांची काळजी घ्या असं ती नेहमी सांगायची. आम्हाला काहीच माहीत नाही, उगाच काही तरी बदनामी करायची, त्यांना काही मुलीबाळी नाहीत काय?, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.

आमची बदनामी थांबवा नाहीतर आम्ही आत्महत्या करू, असंही पूजाची आई म्हणाली आहेत. माझी मुलगी धाडसी होती. तिची हत्या आहे की आत्महत्या याबद्दल काहीच सांगता येत नाहीये, असं म्हणत मंडूबाईंनी बोलण्यास नकार दिलाय. तर यावेळी बोलताना पुजाची बहिण म्हणाली की, ”अरुणला फक्त एकदा पूजासोबत पाहिले होते. माझी बहीण वाघीण होती, ती आत्महत्या करणाऱ्यांपैकी नाही. ती प्रीतम मुंडे आणि पंकजाताई मुंडेंसोबतही फिरलेली आहे. माझी बहीण कार्यकर्ती होती हे अख्ख्या बीडला माहीत आहे, तिचं कोणासोबत नाव जोडणं योग्य नाही, असंही पूजा चव्हाणची बहीण म्हणाली आहे.

“या बदनामीमुळे माझ्या आई-वडिलांना काही झालं, तर तुम्ही माझं पालन-पोषण करणार आहात का? माझी जबाबदारी तुम्ही घेणार का?” असा सवाल पूजाची बहीण दियाने केला आहे. “पूजा ११वीपासून राजकारणात आहे. पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्यासोबत तिने काढलेले फोटो व्हायरल का होत नाहीत? त्या पुरूष नाहीत म्हणून का?” असाही प्रश्न दियाने विचारला आहे.
दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अरुण राठोडचं नाव आलं आहे. हा अरुण राठोड बीडचा असून वन मंत्री संजय राठोड यांचा कार्यकर्ता असल्याचं सांगण्यात येत आहे. तर यवतमाळमधील अरुण राठोड याचा पत्ता शिवाजी नगर, नांदेड असा दाखवण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही प्रकरणातील अरुण राठोड एकच आहेत की दोन्ही वेगळे आहेत? असा सवाल निर्माण झाला आहे.