प्रियकराला प्रपोज करतानाचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; विद्यापीठाने केले विद्यार्थ्यांचे निलंबन
बातमी विदेश

प्रियकराला प्रपोज करतानाचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; विद्यापीठाने केले विद्यार्थ्यांचे निलंबन

सोशल मिडीयावर गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. यात एक तरुणी गुडघे टेकून समोरच्या तरुणाला प्रपोज करत असल्याचे दिसत होतं. हा व्हिडीओ पाकिस्तानातील लाहौर येथील असल्याचे बोलले जात होते. या व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर हे दोघे तरुण तरुणी शिकत असलेल्या विद्यापीठाने त्यांच्यावर कारवाई केली आहे. ”या दोन्ही विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असल्याचे स्पष्टीकरण विद्यापीठाने दिले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या प्रकरणात विद्यापीठ प्रशासनाने म्हटले आहे की, या व्हायरल व्हिडीओनंतर या दोन्ही विद्यार्थ्यांना या घटनेवर चर्चा करण्यासाठी विशेष शिस्त समितीच्या बैठकीस बोलाविण्यात आले होते, मात्र ते दोघेही हजर राहिले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर या दोन्ही विद्यार्थ्याना विद्यापीठ आणि आसपासच्या परिसरात प्रवेशावर बंदी घातली आहे.

विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार विशेष शिस्त समितीची बैठक १२ मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजता रेक्टर कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीला बोलावल्यानंतरही हे दोन विद्यार्थी समितीसमोर हजर झाले नाहीत. त्यामुळे कलम १६ नुसार त्या दोघांना लाहौर युनिव्हर्सिटीच्या कॅम्पस आणि त्यातील सर्व उप-परिसरांमध्ये प्रवेश नाकारण्यात आला आहे.’

दरम्यान, विद्यार्थ्यांना हद्दपार केल्याची बातमी पसरताच ट्विटरवर वादळ निर्माण झाले. अनेक सोशल मीडिया युजर्सनी विद्यार्थ्यांच्या विरोधात अशी कठोर पावले उचलल्याबद्दल विद्यापीठावर जोरदार टीका केली. एका ट्विटर युजरने लिहिले की, ‘मॉरल पोलिसिंग ही विद्यापीठात एक सामान्य गोष्ट झाली आहे. विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक चर्चेवरील युओएलच्या कृती निंदनीय आहेत. धक्कादायक बाब म्हणेज लैंगिक छळ प्रकरणात विद्यापीठ कोणतीही कारवाई करीत नाही.

दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले, ‘तुम्ही मारु शकता, अत्याचार करू शकता, बलात्कार करू शकता, पण जेव्हा तुम्ही प्रेमात पडता तेव्हा ते म्हणतात की,ते इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान आहे. पण सार्वजनिक ठिकाणी एखाद्याचा प्रपोज करण्यात काय चूक आहे? ‘ तर एका युजरने लिहिले, “ज्या देशात बालविवाहाचा बचाव केला जातो आणि लहान मुलींचा धर्म बदलला जातो.” तेथे दोन प्रौढ लोक एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करू शकत नाहीत, आम्ही रोज आमच्या तथाकथित नैतिकतेची चेष्टा करत आहोत. ‘

नक्की काय आहे प्रकरण?
या व्हिडीओत एक मुलगी आपल्या जोडीदारासमोर प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. खरंतर सामान्यपणे मुलगा गुडघे टेकवून मुलीला प्रपोज करताना आपण अनेकदा पहिले असेल. पण या व्हायरल व्हिडीओत चक्क मुलगी जमिनीवर गुडघा टेकून प्रेम व्यक्त करत आहे. तो क्षण, ते वातावरण आणि त्या वातावरणाचे साक्षीदार असलेल्या लोकांची दाद, हे सर्व दैदीप्यमान असं वातावरण व्हिडीओत दिसत आहे.

हा व्हिडीओ पाकिस्तानमधील असल्याची माहिती समोर आली आहे. ते कपल नेमकं कोण आहे त्याची माहिती मिळाली नाही पण तो व्हिडीओ इन्स्टाग्रामवर ‘uol_inside’ नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आलाय. व्हिडीओत एका टेबलवर फुलांच्या पाकळ्या दिसत आहेत. एक मुलगी हातात पुष्पगुच्छ घेऊन जमिनीवर गुडघा ठेवते. तिच्यासमोर काळ्या शर्टात एक सुंदर मुलगा उभा आहे. ती त्या मुलाला जमिनीवर गुडघं टेकून प्रपोज करते. त्याच्याप्रती प्रेम व्यक्त करते आणि त्याच्या हातात पुष्पगुच्छ देते. मुलगा तिच्या प्रपोजचा स्वीकार करतो आणि मुलीच्या हातातून पुष्पगुच्छ घेतो. त्यानंतर दोघं मिठी मारतात. यावेळी मुलीच्या डोळ्यांमधून अश्रू येतात. तर मुलगा गोड स्मितहास्त देत तिला समजवण्याचा प्रयत्न करतो. दुसरीकडे त्यांच्या आजूबाजूला काही तरुण मोबाईलवर त्यांचा व्हिडीओ शूट करताना दिसत आहेत. मुलाने मुलीचा प्रपोज स्वीकारल्यानंतर ते आनंदाने ओरडायला लागतात.