मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; राज्यात रविवारपासून रात्रीची जमावबंदी
बातमी महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; राज्यात रविवारपासून रात्रीची जमावबंदी

मुंबई: राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. संपूर्ण राज्यात रविवारी २८ मार्च २०२१ रात्रीपासून जमावबंदी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. यासंबंधीचे स्वतंत्र आदेश आजच मदत व पुनर्वसन विभागाकडून निर्गमित व्हावेत असेही ते म्हणाले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, जिल्हा शासकीय रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन, जिल्हा तसेच राज्य टास्क फोर्सचे सदस्य, वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता यांच्याशी संवाद साधून कोविड स्थिती, करण्यात येत असलेल्या उपाययोजना जाणून घेतल्या त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, मला लॉकडाऊन लावण्याची अजिबात इच्छा नाही परंतु वाढती रुग्णसंख्या विचारात घेता आपण ज्या आरोग्य सुविधांची मोठ्या प्रमाणात राज्यभर उभारणी केली त्या सुविधाही कमी पडतील की काय अशी शक्यता निर्माण होताना दिसत आहे. हीच बाब लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यांनी त्यांच्या आरोग्य सुविधा, बेडस व औषधांची उपलब्धता आणि त्यात करावयाची वाढ याकडे लक्ष केंद्रीत करावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या.