भारताचा दारुण पराभव; इंग्लंड फलंदाजाकडून भारतीय गोलंदाजांची धुलाई
क्रीडा

भारताचा दारुण पराभव; इंग्लंड फलंदाजाकडून भारतीय गोलंदाजांची धुलाई

पुणे : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला आहे. भारताने इंग्लंडपुढे विजयासाठी ३३७ धावांचे आव्हान ठेवले होते. भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना जॉनी आणि जेसन रॉय यांनी ११० धावांची सलामी देत इंग्लंडच्या विजयाचा पाया रचला. पण यावेळी या दोघांकडून एक चुक झाली आणि चोरटी धाव घेण्याच्या नादात जेसन रॉय बाद झाला. जेसन बाद झाल्यावर जॉनी आक्रमकपणे फलंदाजी करत शतक केले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जॉनीला यावेळी बेन स्टोक्सची चांगली साथ मिळाली. बेन स्टोक्सही यावेळी शतक झळकावेल, असे वाटत होते. पण यावेळी फक्त एका धावेने स्टोक्सचे शतक हुकले. स्टोक्सने यावेळी ५२ चेंडूंत ४ चौकार आणि १० षटकारांच्या जोरावर तुफानी ९९ धावांची खेळी साकारली.

भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ३३६ धावांचा डोंगर उभारला. या सामन्यात भारताची सुरुवात चांगली झाली नाही. शिखर धवन यावेळी फक्त चार धावांवर बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मालाही २५ धावांवर समाधान मानावे लागले होते. त्यावेळी भारताची २ बाद ३७ अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतरही भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी दमदार खेळी साकारली. लोकेश राहुलने यावेळी शतक झळकावले, तर विराट कोहली आणि रिषभ पंत यांनी यावेळी अर्धशतक झळकावले. त्याचबरोबर अखेरच्या १० षटकांमध्ये भारतीय संघाने तब्बल १२६ धावा फटकावल्या आणि त्यामुळेच भारतीय संघाला ३३६ धावांचा डोंगर उभारता आला.