एनआयए’ची धडक कारवाई; सचिन वझें’च्या कार्यालयात टाकलेल्या छाप्यात महत्त्वाचे पुरावे जप्त
बातमी महाराष्ट्र

एनआयए’ची धडक कारवाई; सचिन वझें’च्या कार्यालयात टाकलेल्या छाप्यात महत्त्वाचे पुरावे जप्त

मुंबई : उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील आढळून आलेल्या स्फोटक प्रकरणाचा राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) तपास करत आहे. या प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. अशातच सचिन वझे यांच्या बाबत एक नवीन माहिती समोर आली आहे. एनआयए’ने सचिन वझे यांच्या मुंबई पोलीस आयुक्तालयातील कार्यालयात सोमवारी रात्री छापा टाकला. वझे यांनी तपासानिमित्त मुंबई, ठाण्यातून ताब्यात घेतलेल्या ‘डीव्हीआर’ मिळवण्यासाठी हा छापा टाकण्यात आला होता. एनआयएने जप्त केलेले डीव्हीआर वाझे यांचे वास्तव्य असलेल्या ठाण्यातील गृहनिर्माण संस्थेचे आहेत, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

वाझे राहात असलेल्या गृहनिर्माण संस्थेसह अन्य भागांतील डीव्हीआर त्यांच्या पथकातील सहायक निरीक्षक रियाझ काझी यांनी ताब्यात घेतले होते. आठ तास चाललेल्या शोधमोहिमेत वाझे यांच्या कार्यालयातून दोन डीव्हीआर लॅपटॉप, मोबाइल, आयपॅड, संगणक आणि काही कागदपत्रे पथकाने ताब्यात घेतली आहेत. तर वाझे यांच्या अटकेनंतर एनआयएने गुन्हे शाखेचे सात अधिकारी, अंमलदारांची चौकशी केली. त्यात एक सहायक आयुक्त, एक निरीक्षक, दोन सहायक निरीक्षक आणि तीन अमलदारांचा समावेश आहे.

त्याचबरोबर, अंबानी धमकी प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आरोप, मृत व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या पत्नीने संशय व्यक्त केल्यानंतर गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वाझे यांच्याकडे विचारणा केली. मात्र हे आरोप खोटे असून या प्रकरणात गुंतवण्याचा प्रयत्न असल्याचे वाझे यांनी वरिष्ठांना सांगितले, अशीही माहिती समोर आली आहे.

याबाबत एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटके, धमकीची चिठ्ठी सापडल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे (सीआययू) प्रमुख वझे यांच्यावर सोपविण्यात आली. त्यानंतर त्यांच्या पथकाने वाझे यांच्या सूचनेवरून तपासाच्या निमित्ताने मुंबई, ठाण्यातील निवासी, व्यावसायिक आस्थापनांचे डीव्हीआर ताब्यात घेतले. तपासासाठी जप्त केलेल्या या यंत्रांची मुद्देमाल यादीत नोंद करण्यात आली नव्हती, अशी माहिती एनआयएला मिळाली.

दक्षिण मुंबईतून जप्त करून पेडर रोड येथील कार्यालयात आणलेल्या मर्सिडीज गाडीची तपासणी एनआयए अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास केली. या वेळी सचिन वाझे यांनाही कार्यालयाच्या आवारात आणण्यात आले होते. या गाडीत रोख रक्कम, कपडे, कागदपत्रे आढळली. या कारमधून पाच लाखांपेक्षा जास्त रोकड, नोटा मोजण्याचे यंत्र, काही कपडे आणि स्कॉर्पिओच्या नोंदणी क्रमांक पाट्या आदी हस्तगत करण्यात आले.असे एनआयच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.