शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री करणार एक दिवसाचा उपवास
देश बातमी

शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री करणार एक दिवसाचा उपवास

नवी दिल्ली : शेतकऱ्यांसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल एक दिवसाचा उपवास करणार आहे. अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. त्याचबरोबर केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि देशवासीयांना उद्याचा एक दिवस शेतकऱ्यांसाठी उपवास करण्याचं आवाहन केलं आहे. आपण त्यांच्यासोबत जाऊ शकत नसलो तरीही उपवास करुन आपण त्यांच्या मागण्या मान्य होतील यासाठी प्रार्थना करु असंही केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या १७ दिवसांहून अधिक काळ पंजाब आणि हरयाणा या राज्यांमधले शेतकरी दिल्लीच्या सीमेवर येऊन आंदोलन करत आहेत. सरकारसोबत झालेल्या चर्चेच्या सगळ्या फेऱ्या निष्फळ ठरल्या आहेत. अशात आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक दिवसाचं उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. आम आदमी पक्षाचे सर्व सहकारी आणि देशवासीयांनीही त्यांनी हेच आवाहन केलं आहे.

केजरीवाल यांनी व्हिडिओ पोस्ट करत म्हटले आहे की, मी गेल्या काही दिवसांपासून पाहतो आहे की भाजपचे काही नेते, मंत्री हे शेतकरी आंदोलनावर टीका करत आहेत. हे आंदोलन देशद्रोह्यांचं आहे, देशविरोधी आहे. या शेतकऱ्यांसोबत माजी सैनिकही आंदोलन करत आहेत. काही माजी सैनिक त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत. तरीही तुम्ही शेतकऱ्यांना देशविरोधी म्हणत आहात? असा प्रश्नही अरविंद केजरीवाल यांनी विचारला आहे. एवढंच नाही तर बॉलिवुडचे काही कलाकार हे शेतकरी कुटुंबातले आहेत. देशातल्या डॉक्टरांनी, वकिलांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे मग हे सगळे जण देश विरोधी आहेत का? या प्रश्नांची उत्तरं मोदी सरकारने द्यावीत असंही केजरीवाल यांनी म्हटलं आहे.