मुंबईच्या भाजप कार्यालयात महिलेवर लैंगिक अत्याचार
बातमी मुंबई

मुंबईच्या भाजप कार्यालयात महिलेवर लैंगिक अत्याचार

मुंबई : मुंबईतील भाजपच्या कार्यालयात महिलेचा लैंगिक छळ करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. बोरिवलीत नगरसेविकेच्या कार्यालयातच ही घटना घडली आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या प्रकरणावरुन काँग्रेस आणि शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे. महिलेला न्याय मिळवून देण्याऐवजी तिचा आवाज दाबण्यासाठी भाजप नगरसेविकांनी मारहाण केली असा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भाजपचे नेते महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. फडणवीस सरकारच्या काळातच महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार झाले होते. दुसरीकडे देशपातळीवर भाजपाची सत्ता असणाऱ्या राज्यांमध्ये महिलांवर अत्याचार होत आहेत. आत्ताची घटना त्यापेक्षाही गंभीर आहे. भाजपच्या महिला नेत्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितात आणि दुसरीकडे त्यांच्या कार्यालयात विनयभंग होतो ही गंभीर बाब आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे त्या महिलेने खासदार गोपाळ शेट्टी व आमदार सुनील राणे यांना पत्र लिहून मदत मागितली. मात्र त्यांनी न्याय दिला नाहीच उलट तेथील भाजपा नगरसेविकांनी महिलेला मारहाण केली, असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

धाय मोकळून रडणाऱ्या भाजपाच्या ताई आज कुठे आहेत? भाजपाच्या ताईंचा फोन आज सकाळपासून बंद आहे. भाजपाच्या ताई पब्लिक स्टंटसाठी पुढे येणार आणि आता गप्प बसणार… भाजपच्याच कार्यालयात महिलेला छळलं जातं, मारहाण होते. यांच्या दिव्याखालीच अंधार आहे. मी स्वत: बोरिवलीच्या प्रकरणात लक्ष घालणार असून पोलीस स्टेशनला जाणार आहे. केवळ महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम भाजपाकडून होत आहे. कोणत्याही पक्षाची महिला असो, अन्याय होत असेल तर भूमिका घेतली पाहिजे. मी असते तर थोबाड फोडून टाकलं असतं, असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.