त्या’ फोटोच्या चर्चेनंतर अनिल देशमुखांचे स्पष्टीकरण; म्हणाले…
राजकारण

त्या’ फोटोच्या चर्चेनंतर अनिल देशमुखांचे स्पष्टीकरण; म्हणाले…

मुंबई : “मी औरंगाबादला दौऱ्यावर गेलो होतो. दौऱ्यावर गेल्यानंतर हजारो लोक भेटण्यासाठी येत असतात, निवेदन देत असतात. अशावेळी कोणती व्यक्ती, त्याचा काय व्यवसाय याची माहिती नसते. पण अवश्य यापुढे दक्ष राहीन,” असं स्पष्टीकरण देत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अनिल देशमुख चार दिवसांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. गुन्हेगारांसोबत गृहमंत्र्यांचा फोटो समोर आल्यामुळे सर्वत्र चर्चेला तोंड फुटलं आहे. या फोटोमध्ये अनिल देशमुखांसोबत तीन गुन्हेगार उपस्थित असल्याने विरोधकांकडून टीका केली जात आहे. अनिल देशमुख यांच्यासोबत असणाऱ्या तिघांवरही गंभीर गुन्हे दाखल असल्याने या फोटोवरुन आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अनिल देशमुख गृहमंत्री असल्याने याकडे अधिक गांभीर्याने पाहिलं जात आहे. दरम्यान अनिल देशमुख यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

अनिल देशमुखांच्या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये कलीम कुरेशी, सय्यद मतीन आणि जफर बिल्डर यांचा समावेश आहे. या तिघांवरही गंभीर गुन्हे दाखल आहेत. यातील दोन जण एमआयएमचे माजी नगरसेवक आहेत.

कलीम कुरेशी, सय्यद मतीन आणि जफर बिल्डर यांच्यावर औरंगाबाद शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. सय्यद मतीन याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल असून तो जेलमध्येही होता. सय्यद मतीन याची एमआयएमने पक्षातून हकालपट्टी केली आहे. तर कलीम कुरेशी याची औरंगाबाद शहरात गुटखा किंग म्हणून ओळख आहे.

दरम्यान, औरंगाबाद दौऱ्यावर असताना अनिल देशमुख यांनी शक्ती कायद्याचा पुनरुच्चार केला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ”शक्ती कायद्याचा पुनरुच्चार महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायदा महत्त्वाचा आहे. कायद्याची चौकट अधिक बळकट करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. कमी वेळेत निकाल लागणं गरजेचं आहे. समितीत सर्वपक्षीय आमदार आहेत. नागपूर, मुंबई आणि औरंगाबादमध्ये बैठक झाली. सर्व सूचना ऐकून घेतल्या.

कायद्याचं प्रारुप आम्ही विधानसभेत ठेऊ. महिलांविरोधी गुन्ह्याचा 21 दिवसात तपास झाला पाहिजे. आरोपींना जन्मठेपेपर्यंत शिक्षेची तरतूद असेल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. महिलेने खोटी तक्रार केल्याचं तपासात उघड झालं, तर कारवाई होणार, असा इशाराही अनिल देशमुखांनी दिला. 36 कोर्ट सुरु करणार असून विशेष टीम तपास करणार, साडे बारा हजार पोलिसांची भरती करणार असल्याची माहितीही गृहमंत्र्यांनी औरंगाबाद दौऱ्यात दिली होती.