राठोडांच्या शक्तीप्रदर्शनावर आशिष शेलारांचा टोला ; गर्दी जमवणाऱ्या एका “गबरुवर” कारवाई नाही
राजकारण

राठोडांच्या शक्तीप्रदर्शनावर आशिष शेलारांचा टोला ; गर्दी जमवणाऱ्या एका “गबरुवर” कारवाई नाही

मुंबई : “कोरोना काळात गर्दी केली म्हणून १० हजार जणांवर गुन्हे दाखल करु, पण गर्दी जमवणाऱ्या एका “गबरुवर” कारवाई नाही,” असा टोला लगावत भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाने चर्चेत आलेल्या वनमंत्री संजय राठोड यांनी सोमवारी (ता. २३) वाशिम येथील पोहरा देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, “कोरोना काळात गर्दी केली म्हणून १० हजार जणांवर गुन्हे दाखल करु, पण गर्दी जमवणाऱ्या एका “गबरुवर” कारवाई नाही. एका भगिनीचा जीव गेला, महाराष्ट्र हळहळला पण मुख्यमंत्री बोलणार नाहीत. महाविकास आघाडी सरकारचे महाराष्ट्रात सुरु आहे… तो मी नव्हेच,” अशी टीका शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.

दरम्यान, पूजा चव्हाण प्रकरणात नाव आल्यानंतर राज्याचे वनमंत्री संजय राठोड सार्वजनिक जीवनापासून अलिप्त झाले होते. अशातच पोहरा देवीच्या दर्शणासाठी गेल्यानंतर संजय राठोड यांनी केलेल्या शक्तीप्रदर्शनावरून राजकारण पेटलं आहे. या प्रकरणावर १५ दिवस मौन धरल्यानंतर राठोड यांनी काल अखेर २३ फेब्रवारी रोजी ते सर्वांसमोर आले. त्यानंतर त्यांनी पोहरादेवीत शक्तीप्रदर्शन करत दर्शन घेतलं होतं. मात्र आता संजय राठोड यांनी गर्दी जमवल्याचा आरोप होत असून, त्यावरून आता भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे.

तसेच, काल पोहरादेवी येथे दर्शन घेतल्यानंतर आपण उद्याापासून कामाला सुरूवात करणार असल्याचं संजय राठोड यांनी म्हटलं होतं. ठरल्याप्रमाणे राठोड आज मुंबईत दाखल झाले आहेत. विरोधकांकडून राठोड यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली जात आहे. पण, कालच त्यांनी अप्रत्यक्षरित्या राजीनामा देणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आता आशिष शेलार यांच्या या टीकेला राज्यसरकार काय उत्तर मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.