आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
राजकारण

आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

पुणे : कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव व इषा झा यांच्या विरोधात चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औंध परिसरात एका व्यक्तीला जबर मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून पुण्यातील चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मिळालेल्या माहितीनुसार, अमन अजय चड्डा यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार हर्षवर्धन रायभान जाधव (वय ४३, रा. बालेवाडी, पुणे) आणि इषा बालाकांत झा (वय ३७, रा. वाकड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार अमन चड्डा यांचे आई-वडील सोमवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरुन औंधवरुन संघवी नगरकडे निघाले होते.

त्यावेळी जाधव यांनी आपल्या चारचाकीचा दरवाजा अचानक उघडला. त्यामुळे अपघात झाला. त्यावरुन चड्डा यांच्या वडिलांनी जाधव यांना जाब विचारला. त्यावेळी आरोपींनी चड्डा यांच्या आई आणि वडिल्यांच्या छातीवर आणि पोटावर लाथा मारल्या. आपलं हृदयाचं ऑपरेशन झाल्याचं चड्डा यांच्या वडिलांनी सांगितल्यानंतरही मारहाण सुरुच ठेवल्याचा आरोप अमन चड्डा यांनी केला आहे. दरम्यान हर्षवर्धन जाधव आणि इषा झा यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

या प्रकरणी चड्डा यांनी तक्रार दिल्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षवर्धन जाधव आणि इषा झा यांना अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, हर्षवर्धन जाधव यांनी मे महिन्यात एक व्हिडीओ संदेश जारी करुन आपण राजकारणातून संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं होतं. आपण ज्या गोष्टींसाठी विनाकारण पळत राहतो. त्या कितपत खऱ्या आहेत याची जाणीव मला झाली आहे. म्हणून मी राजकारणातून निवृत्ती घेत आहे. माझी उत्तराधिकारी पत्नी संजना जाधव असेल, असं हर्षवर्धन जाधव म्हणाले होते.