सत्ता डोक्यात जाता कामा नये; हिवाळी अधिवेशनात फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
राजकारण

सत्ता डोक्यात जाता कामा नये; हिवाळी अधिवेशनात फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

मुंबई : “अर्णब गोस्वामी किंवा कंगना रणौत असतील आम्ही त्यांच्या वक्तव्याशी सहमत नाही. विरोधी पक्षनेता म्हणून मी रेकॉर्डवर सांगतोय की आमच्या मुख्यमंत्र्यांचा उल्लेख योग्यच केला पाहिजे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. देशाच्या पंतप्रधानांचा उल्लेखही योग्यच झाला पाहिजे,” अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पण सत्ता डोक्यात जाता कामा नये, असा टोलाही त्यांनी यावेळी सत्ताधारी पक्षाला लगावला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हक्कभंगाच्या प्रस्तावाचा मुद्दा मांडत कंगना आणि अर्णब गोस्वामी यांचा उल्लेख केला. या मुद्द्यावरून फडणवीसांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, “कायद्याच्या राज्यात प्रत्येक गोष्टीला कायद्याने उत्तर द्यायचं असतं. एखाद्याने चूक केली तर कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे. पण आमच्याविरोधात बोललं तर पोलिसांचा वापर करु असं सुरु आहे. सोशल मीडियावर या सरकारविरोधात एकही वाक्य लिहिलं तर तुम्हाला अटक झाल्याशिवाय राहत नाही अशी परिस्थिती आहे.” अशी टीका यावेळी त्यांनी केली.

“अर्णब गोस्वामी चुकीचं वागत होते, ५० कायदे आपल्याकडे आहेत. ज्याच्या माध्यमातून कारवाई केली जाऊ शकत होती. पण यांनी बंद झालेली केस ओपन केली,” यावेळी त्यांनी सत्ताधारी नेत्यांना सुप्रीम कोर्टाची ऑर्डर वाचा असं सांगत हायकमांड म्हणजे सुप्रीम कोर्ट नाही असं सुनावलं. फडणवीसांनी यावेळी सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णयही वाचून दाखवला.

“चुकीचं सांगण्याची मला हौस नाही. सत्ता डोक्यात जाता कामा नये. हा दुरुपयोग आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयातून आपण काही शिकणार आहोत की नाही,” अशी विचारणा फडणवीसांनी यावेळी केली. “मी पुन्हा सांगतो की सन्माननीय उद्धव ठाकरेजी, माननीय मुख्यमंत्री किंवा सन्माननीय आदित्य ठाकरेजी यांच्याबद्दल अर्णब गोस्वामी जे बोलले ते मला मान्य नाही. ते चुकीचं आहे. असं बोलण्याचा अधिकार नाही,” याचा फडणवीसांनी पुनरुच्चार केला.