मंत्रालयात दारूच्या बाटल्या; विरोधी पक्षनेत्यांची सरकारवर जोरदार टीका
राजकारण

मंत्रालयात दारूच्या बाटल्या; विरोधी पक्षनेत्यांची सरकारवर जोरदार टीका

मुंबई : मंत्रालयात दारूच्या बाटल्या सापडल्याची धक्कादायक घटना आज समोर आली आहे. सर्वत्र याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तर, हा प्रकार समोर आल्यानंतर विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आता महाविकासाआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच, महाराष्ट्राच्या परंपरेला काळीमा फासणारी अशी घटना आज समोर आली आहे, असं म्हणत त्यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरेकर म्हणाले, ‘मंत्रालयामध्ये दारूच्या बाटल्या सापडणे अत्यंत दुर्दैवी, चीड आणणारी आणि शरम आणणारी अशी घटना आहे. राज्यामध्ये कोविड परिस्थिति बरोबर पूरग्रस्त परिस्थिति उभी आहे. एका बाजूला मंत्रालयामध्ये सर्वसामान्य लोकांना प्रवेश मिळणं आपल्या न्यायहक्कासाठी दुरापास्त असताना दारूच्या बाटल्या मंत्रालयांमध्ये कशा पोहचू शकतात? तसेच, दारूच्या बाटल्या मंत्रालायामध्ये कोणी आणल्या आणि कशासाठी आणल्या? या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, संबंधितांवर कारवाई झालीचं पाहिजे. या प्रकरणावरून सरकारची मानसिकता, सरकारचा कारभार कोणासाठी, कशासाठी चालला आहे हे दिसून येत आहे. हे सरकार नेमकं कोणासाठी काम करत आहे. धनदांडग्यांसाठी करतंय, दारू विक्रेतयांसाठी करतंय, डान्स बार वाल्यांसाठी किंवा रेस्टोरंट वाल्यांसाठी काम करत आहे, की सर्वसामान्य नागरिकांसाठी काम करतंय हे एकदा जनतेला कळलं पाहिजे, असंही प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, सर्वसामान्यांना तपासणी शिवाय सहजासहजी प्रवेश न मिळणाऱ्या राज्याच्या मंत्रालयात दारूच्या बाटल्यांचा खच आढळल्याचे विशेष वृत्त एबीपी माझाने दिले. मंत्रालयातील मुख्य भाग असलेल्या त्रिमुर्तीच्या मागील बाजूस दारूच्या बाटल्यांचा खच कॅमेऱ्यात कैद झाला असल्याचे दाखवले गेले आहे. हा प्रकर समोर आल्यानंततर एकच खळबळ उडाली. मंत्रालयात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले असताना व तपसाणी केली जात असातनाही, एवढ्या दारूच्या बाटल्या आल्या कशा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.