ममता बॅनर्जींना उच्च न्यायालयाचा झटका
राजकारण

ममता बॅनर्जींना उच्च न्यायालयाचा झटका

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना कोलकाता उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारप्रकरणी न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. याशिवाय कोलकाता उच्च न्यायालयाने हिंसाचाराच्या घटनांची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेशही दिले आहेत. पश्चिम बंगाल संवर्गातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही यात समावेश असेल.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

बंगालच्या तृणमूल सरकारने हिंसाचाराच्या घटनांच्या सीबीआय चौकशीला विरोध केला होता. अशा परिस्थितीत उच्च न्यायालयाचा हा निर्णय महत्त्वाचा ठरला आहे. बंगालमधील निवडणुकीनंतर हिंसाचारादरम्यान झालेल्या हत्या, बलात्काराच्या प्रकरणांची उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय इतर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे.

सीबीआय आणि एसआयटीचा तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली होईल. न्यायालयाने सीबीआयला ६ आठवड्यांच्या आत आपला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्य न्यायमूर्ती राजेश बिंदल यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय खंडपीठासमोर राज्यातील मतदानानंतरच्या हिंसाचाराची निष्पक्ष चौकशी करण्याच्या याचिकांवर सुनावणी झाली. ३ ऑगस्ट रोजी सुनावणी दरम्यान न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता.