देवेंद्र फडणवीसांची बदनामी करणारा अखेर जेरबंद
राजकारण

देवेंद्र फडणवीसांची बदनामी करणारा अखेर जेरबंद

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे तृतीयपंथी व्यक्तीसोबत समलैंगिक संबंध असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीला वाकड पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. फडणवीस यांनी तृतीयपंथी व्यक्तीस खोटे आश्वासन देऊन त्यांच्याशी समलैंगिक संबंध ठेवले असल्याचा धक्कादायक आरोप पिंपरी-चिंचवड शहरातील युवराज दाखले या व्यक्तीने एका व्हिडिओतून केला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

“विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना एका तृतीयपंथी व्यक्तीस खोटे आश्वासन देऊन त्यांच्याशी समलैंगिक संबंध ठेवले असल्याचा आरोप दाखले याने केला. युवराज दाखले याने माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या प्रदेश सदस्या कोमल रमेश शिंदे यांनी फिर्याद दिली होती. त्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. याप्रकरणी पोलिसांनी दाखले याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

त्याचबरोबर, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह, अश्लील व बदनामीकारक मजकूर असलेले वक्तव्य करून आरोपीने त्याचा व्हिडिओ युट्यूबवर प्रसारित केला. त्याबाबत आरोपीकडे कोणत्याही प्रकारचा पुरावा नसतानाही सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित केला. त्यामुळे फिर्यादी आणि पक्षाचे इतर कार्यकर्ते यांच्यात असंतोष व रोष निर्माण होऊन भावना दुखावल्या गेल्या, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

भारतीय दंड विधान कलम २९४, ५०० नुसार गुन्हा दाखल केला आहे. वाकड पोलिसांनी आरोपी दाखले याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे. तर याप्रकरणी भाजपाने संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून संबंधित व्यक्तीवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन विधानसभेत दिले होतं.