शिवसेना खासदार आणि भाजप आमदारांमध्ये राडा
राजकारण

शिवसेना खासदार आणि भाजप आमदारांमध्ये राडा

वाशिम : वाशिमच्या खासदार भावना गवळी आणि आमदार राजेंद्र पाटणी यांच्यामध्ये झालेल्या शाब्दिक वादामुळे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी खासदार आणि आमदारांनी परस्परविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

वाशिममध्ये प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जिल्हा नियोजन समितीची सभा सुरू होण्याअगोदर खासदार भावना गवळी आणि आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यामध्ये गुंठेवारी शेतकऱ्यांची समस्या निकाली काढण्यावरून चर्चा सुरू होती. नेमकं त्याचवेळी आमदार राजेंद्र पाटणी तिथे आले होते. त्यावेळी राजेंद्र पाटणी आणि भावना गवळी यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर आमदार राजेंद्र पाटणी यांनी वाशिम पोलिसात खासदार भावना गवळी यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली.

तर दुसरीकडे, ‘मी गुंठेवारी सुरू होऊ देणार नाही आणि मी महिला असतांना त्यांनी माझ्यासोबत हुज्जत घातली, त्यामुळे मी त्यांच्या विरुद्ध तक्रार करीत आहे’ असं भावना गवळी यांनी सांगितलं. त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये आमदार आणि खासदारांनी एकाच दिवशी एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली. सद्यस्थितीत शहरातील वातावरण निवळले असून शांतता आहे. राजकीय वादामुळे शहरासह जिल्ह्यात एकच चर्चा रंगली होती.