सचिन तेंडुलकरने केलेल्या ट्वीटवर राज ठाकरेंनी सोडलं मौन; म्हणाले…
राजकारण

सचिन तेंडुलकरने केलेल्या ट्वीटवर राज ठाकरेंनी सोडलं मौन; म्हणाले…

मुंबई : अमेरिकन पॉपस्टार रिहानानं शेतकरी आंदोलनासंदर्भात ट्विट केल्यानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं होतं. त्यानंतर भारतरत्न सचिन तेंडुलकर लता मंगेशकर अशा मान्यवरांनी ट्वीट केले होते. यावर प्रथमच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले, सरकारनं या गोष्टी करायला नको. ही सगळी खूप मोठी लोकं आहेत. या लोकांना अशा प्रकारचं ट्विट करायला सांगणं. एकाच हॅशटॅगवर सगळ्या लोकांची ट्विट येणं. ही खूपच मोठी माणसं आहेत. त्यांना सरकारने अशा गोष्टींमध्ये पडायला लावू नये. हा सरकारच्या धोरणाचा विषय आहे. हा काही देशाचा विषय नाही. काही चीनमधून संकट आलंय. पाकिस्तानमधून आलंय. शेतकऱ्यांचं संकट आहेच मोठं, पण या सर्व गोष्टींसाठी सर्व लोकांना… त्या अक्षय कुमारवरती आटपायचा ना विषय. लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर ही भारतरत्नं आहेत. खूप मोठी माणसं आहेत. त्यांना अशा गोष्टी करायला सांगणं… ती साधी माणसं आहेत. सरकारनं त्यांना सांगितलं, त्यांनी ट्विट केलं, पण आज जे ट्रोल होतंय आज त्यांच्यावरच येतंय, असं म्हणत राज ठाकरे यांनी सरकारला फटकारलं.

दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाच्या उत्तरानंतर देशातील कला व क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी ट्विट करत देशाच्या अखंडतेचा पुनरुच्चार केला होता. यात भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांनीही ट्विट केलं होतं. या मुद्द्यावर राज ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी मोदी सरकारला फटकारलं आहे.