पंतप्रधान मोदींच्या सख्ख्या पुतणीला भाजपानं नाकारलं तिकीट
राजकारण

पंतप्रधान मोदींच्या सख्ख्या पुतणीला भाजपानं नाकारलं तिकीट

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सख्या पुतणीला भाजपने अहमदाबाद महानगरपालिका निवडणुकीसाठी तिकीट नाकारलं आहे. मोदींची पुतणी सोनल मोदी यांना भाजपने तिकीट नाकारले आहे. गुजरात भाजपकडून काल (ता. ०४) महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली, त्यात सोनल मोदी यांचं नाव कोणत्याही वॉर्डातून घोषित करण्यात आलेलं नाही.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मोदींची पुतणी म्हणून नव्हे तर सामान्य भाजपा कार्यकर्ता म्हणून अहमदाबाद महानगरपालिकेची निवडणूक लढवायची आहे, असं सोनल मोदी अलिकडेच माध्यमांशी बोलताना म्हणाल्या होत्या. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार सोनल मोदी यांनी अहमदाबादच्या बोदकदेव वॉर्डातून भाजपकडे तिकीट मागितलं होतं. काल भाजपकडून उमेदवारांची घोषणा केली गेली. पण त्यात सोनल मोदी यांचं नाव नव्हतं. या आठवड्याच्या सुरूवातीलाच गुजरात भाजपने पक्षातील नेत्यांच्या नातलगांना तिकीट द्यायचं नाही असा निर्णय घेतला होता. याबाबत भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांना विचारलं असता, सर्वांसाठी नियम सारखेच आहेत असं ते म्हणाले.

कोण आहेत सोनल मोदी?
सोनल मोदी या नरेंद्र मोदींच्या सख्ख्या पुतणी आहेत. त्या नरेंद्र मोदींचे सख्खे बंधू प्रल्हाद मोदी यांच्या कन्या आहेत. प्रल्हाद मोदी यांचं किराणा मालाचं दुकान असून ते गुजरात फेअर प्राइस शॉप असोसिएशनचे अध्यक्षही आहेत.

काय आहे भाजपचा नवीन नियम?
गुजरात भाजपा संसदीय मंडळाने जारी केलेल्या नवीन नियमांनुसार, 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कार्यकर्त्यांना आणि ज्यांनी नगरसेवक म्हणून तीन वेळा काम केले आहे अशांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (ग्रामपंचायत, नगरपालिका व महापालिका) निवडणुकीसाठी निवडणूक लढविण्यासाठी तिकीट दिले जाणार नाही.