राठोडांच्या राजीनाम्यावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया; म्हणाले…
राजकारण

राठोडांच्या राजीनाम्यावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मंत्री संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला. राठोड यांच्या राजीनाम्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. या प्रकरणी काँग्रेस प्रदेक्षाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील शिवसेनेला अप्रत्यक्ष इशारा दिला होता. ”काँग्रेसच्या बाबतीत जेव्हा असे आरोप झाले होते, तेव्हा मंत्रीच काय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा राजीनामे दिलेले आहेत, तेही चौकशी पूर्ण होण्याआधी,” असं वक्तव्य पटोले यांनी केलंय. मात्र यावेळी भाजपकडून होत असलेल्या आरोपांचाही पटोले यांनी समाचार घेतला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

”भाजपला घाई झाली आहे, त्यामुळे ते असे आरोप करत आहेत. पूजाचे कुटुंबीय सुद्धा ही गोष्ट मान्य करत नाही, त्यामुळे जो काही निर्णय आहे तो चौकशीनंतर शिवसेना पक्षप्रमुख घेतील असा विश्वास असल्याचे नाना म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्ष पदावरही भाष्य केले. ते म्हणाले की, ”आता काही आमदार मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आहेत त्यामुळे विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक आता घेणार नाही. पण जर कोरोनाची भीती कमी वाटली तर निवडणूक या अधिवेशनात पण होऊ शकते, असेही संकेत पटोले यांनी दिलेत.

दरम्यान, संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर आपली भूमिका मांडली आहे. गेल्या 30 वर्षांपासून मी राजकीय जीवनात आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्ष, प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियातून मला राजकीय जीवनातून उठविण्याचा घाणेरडा प्रयत्न केला. आज मला उद्ध्वस्थ केलं आहे. या प्रकरणाचा तपास होऊन जर मी दोषी निघालो असतो तर मी राजीनामा दिला असता. पण मला वेळ दिला नाही. त्यामुळे मी बाजुला झालो आहे, या प्रकरणाचा निष्पक्ष तपास व्हावा अशी माझी अपेक्षा आहे. या प्रकरणाचा माझ्या व्यक्तिगत आणि राजकीय जीवनावर परिणाम झाला आहे. माझ्या समाजावरही याचा परिणाम झाला आहे. आम्ही अधिवेशनच चालू देणार नाही, ही विरोधी पक्षाची भूमिका लोकशाहीविरोधी आहे. त्यामुळे सत्य बाहेर यायचे असेल तर चौकशी होऊ द्यावी लागेल.’ असेही यावेळी राठोड यांनी नमूद केले.