तिसऱ्या टप्प्यातील चाचणी होण्याआधीच लसीला मान्यता कशी दिली?; कॉंग्रेस नेत्याचा सवाल
राजकारण

तिसऱ्या टप्प्यातील चाचणी होण्याआधीच लसीला मान्यता कशी दिली?; कॉंग्रेस नेत्याचा सवाल

नवी दिल्ली : “कोव्हॅक्सिनवर अद्याप तिसऱ्या टप्प्यातील चाचणी झालेली नाही. या वॅक्सीनला अगोदरच मान्यता दिली गेली आहे हे धोकादायक ठरू शकतं. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यायला हवं. सर्व चाचण्या होईपर्यंत याचा वापर करणं टाळायला हवं. दरम्यान भारत अ‍ॅस्ट्रॅजेनेका वॅक्सीनसह मोहीम सुरू करू शकतो.” असं म्हणत कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी मंजुरी दिलेल्या लसीबाबत शंका उपस्थित केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भारतात सीरम आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना आपात्कालीन वापरासाठी संमती देण्यात आली आहे. डीसीजीआयने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. मात्र, आता कोरोना लसीवरून काँग्रेस ज्येष्ठ नेते जयराम रमेश व शशी थरूर यांनी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला मान्यता देण्यात आल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे.

“भारत बायोटेक प्रथम श्रेणीचा उद्योग आहे. परंतु आश्चर्यकारक बाब ही आहे की, कोव्हॅक्सिनसाठी तिसऱ्या टप्प्यातील चाचणी संबंधी आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळालेल्या प्रोटोकॉलमध्ये सुधारणा केल्या जात आहेत.आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं पाहिजे.” अशी मागणी जयराम रमेश यांनी केली आहे.

अगोदर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी वॅक्सीनबाबत शंका उपस्थित केली होती. तसेच, मी ही लस टोचवून घेणार नाही, भाजपाच्या लसीवर आम्ही कसा काय विश्वास ठेवू? असं त्यांनी म्हटलं होतं. मात्र आज त्यांनी आपली भूमिका बदलल्याचं दिसून आलं. लसीकरणास लवकरात लवकर सुरूवात व्हावी, असं अखिलेश म्हणाले आहेत. तर या वॅक्सीनमुळे तुम्ही नपुंसक होऊ शकता, असे खळबळजनक वक्तव्य समाजवादी पार्टीचे आमदार आशुतोष सिन्हा यांनी केलं आहे.