आरएसएसमध्ये महिलांचा सन्मान नाही, ही पुरुषवादी संघटना; राहुल गांधींचा हल्लाबोल
राजकारण

आरएसएसमध्ये महिलांचा सन्मान नाही, ही पुरुषवादी संघटना; राहुल गांधींचा हल्लाबोल

नवी दिल्ली : आरएसएसमध्ये महिलांचा सन्मान नाही, ही पुरुषवादी संघटना आहे. दुर्दैवाने देशावर नियंत्रण ठेवणारी ही संघटना फॅसिस्ट, पुरुषवादी आहे. आरएसएसमध्ये महिलांना समाविष्ट होण्याची परवानगी नाही. अशा शब्दात कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

रविवारी तामिळनाडूच्या इरोड येथे रोड शो दरम्यान उपस्थित लोकांना संबोधित करताना ते बोलत होते. तसेच, ”मी येथे काय करावे हे सांगण्यासाठी आलो नाही किंवा “मन की बात” बद्दल तुमच्याशी बोलण्यासाठी आलो नाही. मी येथे आपल्या समस्या ऐकण्यासाठी आणि समस्यांचं निराकरण करण्यासाठी आलो आहे.” असेही राहुल गांधी यांनी यावेळी म्हंटले.

यावर्षी एप्रिल-मे महिन्यात तामिळनाडू विधानसभेची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल तामिळनाडूमध्ये निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. त्यांनी तीन दिवसांच्या तमिळनाडू दौर्‍याची सुरुवात कोयंबतूर येथून केली. यादरम्यान ते लोकांना भेटले आणि अनेक ठिकाणी लोकांना संबोधित केले.

याच दरम्यान राहुल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही हल्लाबोल केला आहे. शनिवारी राहुल यांनी तिरुपूरमधील जनतेला संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी आरएसएसवर टीकास्त्र सो़डलं आहे. आरएसएसमध्ये महिलांचा सन्मान नाही, ही पुरुषवादी संघटना असल्याचं राहुल यांनी म्हटलं आहे.

“महिलांना समान स्थान दिल्याशिवाय कोणताही देश प्रगती करू शकत नाही या गोष्टीशी मी सहमत आहे. दुर्दैवाने देशावर नियंत्रण ठेवणारी ही संघटना फॅसिस्ट, पुरुषवादी आहे. आरएसएसमध्ये महिलांना समाविष्ट होण्याची परवानगी नाही. आरएसएसमध्ये सुरुवातीपासूनच महिलांशी भेदभाव केला जात होता. ते महिलांचा आदर करत नाहीत. आदर केला असता तर त्यांनी महिलांचा संघटनेत समावेश केला असता” असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

तसेच ‘नरेंद्र मोदी एक एक करून देशातील जनतेशी संबंधित असलेली प्रत्येक वस्तू विकत आहेत. मोदींनी बड्या उद्योजकांशी भागीदारी केली आणि जनतेच्या मालकीचं सर्व काही विकत आहेत’ असा आरोप देखील राहुल गांधी यांनी केला आहे.  तसेच, “पंतप्रधान नरेंद मोदी तामिळनाडूची संस्कृती, भाषा आणि लोकांचा आदर करत नाहीत. तामिळनाडुतील लोकं, भाषा व संस्कृतीने त्यांच्या विचारांच्या आणि संस्कृतीच्या अधीन असायला हवं असं त्यांचं मत आहे.

तसेच न्यू इंडियाची त्यांची धारणा आहे की, तामिळनाडूतील लोकांनी देशात दुसऱ्या दर्जाचे नागरीक असायला हवं. या देशात अनेक भाषा आहेत. आम्हाला असं वाटतं की सर्व भाषा, तामिळ, हिंदी, बंगाली, इंग्रजी इत्यादींचे या देशात स्थान आहे” असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून रोड शो चा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. तसेच यासोबत पुन्हा एकदा तामिळनाडूमध्ये येऊन खूश असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांनी ट्वीट करत केंद्र सरकारवर वाढत्या इंधन दराबाबत जोरदार हल्ला चढवला होता. सर्वसामान्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे आणि मोदी सरकार कर वसूल करण्यात व्यस्त आहे. राहुल यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की, “जीडीपी ‘म्हणजेच गॅस-डिझेल-पेट्रोलमध्ये मोदीजींनी प्रचंड वाढ केली आहे. जनतेच्या महागाईमुळे त्रस्त असलेले मोदी सरकार कर वसुलीत व्यस्त आहेत. मोदी सरकार लोकांच्या आशा व गरजा दुर्लक्षित करून काही भांडवलदारांसाठी काम करत आहे, असं राहुल गांधी यांनी ट्वीटमध्ये म्हटलं.