प्रितम मुंडे यांच्याबद्दल पंकजा मुंडे यांनी दिली महत्वपूर्ण माहिती
राजकारण

प्रितम मुंडे यांच्याबद्दल पंकजा मुंडे यांनी दिली महत्वपूर्ण माहिती

मुंबई : देशात केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा सुरू असून संध्याकाळपर्यंत नव्या कॅबिनेटची अंतिम यादी स्पष्ट होणार आहे. मोदींच्या या नव्या कॅबिनेटमध्ये यंग ब्रिगेडचा समावेश असणार असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर बीडच्या खासदार आणि भाजपा नेत्या प्रीतम मुंडे यांचा देखील केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो, अशी चर्चा सुरू होती. दरम्यान, राज्यातील इतर काही इच्छुक नेत्यांसोबतच खासदार मुंडे दिल्लीत दाखल झाल्याची बातमी पसरली असताना ते वृत्त चुकीचं असल्याची महत्वपूर्ण माहिती माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे. पंकजा मुंडे यांनी आपल्या ट्वीटरवरून हे ट्वीट केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पंकजा मुंडेंचं ट्वीट!
मंत्रिमंडळ विस्तारामध्ये यंग ब्रिगेडसोबत खासदार प्रीतम मुंडे यांचा देखील समावेश होण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली. यासाठीच खासदार प्रीतम मुंडे दिल्लीत दाखल झाल्या असल्याचं वृत्त समोर आलं. मात्र, ते वृत्त चुकीचं असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. खासदार प्रीतम मुंडे दिल्लीत दाखल झाल्याची बातमी मी स्वत: पाहिली. ती बातमी चुकीची आणि खोटी आहे. मी, प्रीतम ताई, आम्ही सर्व कुटुंबीय आमच्या मुंबईच्या निवासस्थानी आहोत, असं पंकजा मुंडे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारासाठी आज महाराष्ट्रातील रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे या मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्यासोबतच ऐन कोरोनाच्या काळात केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी देखील राजीनामा दिला आहे. याशिवाय, थावरचंद गेहलोत, रमेश पोखरियाल, सदानंद गौडा, संतोश गंगवार, देबर्षी चौधरी, रतनलाल कटारिया, प्रताप चंद्र सारंगी, अश्विनी चौबे यांनी देखील आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.