आता तर नुसती सुरूवात झाली आहे; देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान
राजकारण

आता तर नुसती सुरूवात झाली आहे; देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान

मुंबई : “आता तर नुसती सुरूवात झाली आहे; एकच भाग बाहेर आला आहे, दुसरा भाग अत्यंत महत्वाचा आहे” अशी प्रतिक्रिया देत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराजवळ एका गाडीत स्फोटकं सापडली होती. या प्रकरणाचा तपास एनआयएकडून सुरू असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक करण्यात आली. या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, ” हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे, ज्यावेळी याचे काही पुरावे माझ्याजवळ आले. त्यावेळी मी ते सभागृहात यासाठीच मांडले. की समजा पोलिसमधीलच लोकं अशाप्रकारे जर काम करणार असतील आणि अशाप्रकारच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी होणार असतील, तर कायदा आणि सुव्यवस्था राहील कशी? म्हणून हा सगळा विषय मी सातत्याने मांडत होतो. परंतु दुर्देवाने सरकारच्यावतीने केवळ त्यांना पाठीशी घालण्याचं काम सातत्याने होत होतं. कुठंतरी त्यांची वकिली करण्याचं काम हे सरकारच्यावतीने सातत्याने होत होतं. मला असं वाटतं की आती जी एनआयएची कारवाई झाली आहे. त्यामध्ये अनेक पुरावे एनआयएला मिळालेले आहेत. कशाप्रकारे हा संपूर्ण गुन्हा घडला आहे? हे देखील समोर आलेलं आहे.”

फडणवीस पुढे म्हणाले की, “ सचिन वाझे हे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निलंबित होते. ज्यावेळी मी मुख्यमंत्री होतो आणि माझ्याकडे गृह खातं होतं, त्यावेळी अशाप्रकारचा आग्रह शिवसेनेच्या नेत्यांनी धरला होती की, त्यांना पुन्हा घेतलं पाहिजे. म्हणून त्यावेळी मी अॅडव्हकेट जनरल यांना बोलवून ती फाईल दाखवली होती आणि त्यावेळी मला असा सल्ला दिला गेला होता की, उच्च न्यायालयाच्या आदेशाने ते निलंबित झालेले असल्याने त्यांना घेणं योग्य होणार नाही, तो उच्च न्यायालयाचा अपमान होईल. मात्र हे सरकार आल्यानंतर त्यांनी कोरोनाचं कारण दाखवून करोनात आम्हाला निलंबित अधिकारी हवे आहेत, असं कारण दाखवून त्यांना पुन्हा घेतलं. मात्र आता हे केवळ सचिन वाझे यांच्या पुरतं मर्यादित नाही. कोण कोण यामाध्ये आहे? कोणाला याचा पाठिंबा आहे? कुणी कुणी या प्रकरणात काय काय भूमिका निभावली आहे? या सर्व गोष्टी बाहेर येणं आवश्यक आहे. मला असं वाटतं आता ही नुसती सुरूवात झाली आहे.

तसेच, “परंतु आता तरी यातला एकच भाग बाहेर आलेला आहे. दुसरा भाग अत्यंत महत्वाचा आहे. मनसुख हिरेन यांची जी हत्या आहे, आता तर ही गाडी त्या ठिकाणी ठेवल्याचा जो गुन्हा आहे. त्या गुन्ह्याच्या संदर्भात आज एनआयएने आज रिमांड मागितला आहे. परंतु, मनसुख हिरेन हत्याप्रकरण देखील महत्वाचं आहे. त्यामध्येही प्रचंड मोठे धागेदोरे आणि पुरावे हे मला असं वाटतं की, तपासयंत्रणांना उपलब्ध होत आहेत. त्यामध्येही लवकरच कारवाई होईल अशी माझी अपेक्षा आहे.” असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.