होय, मी देवेंद्र फडणवीसांना भेटलो, अशोक चव्हाणांची कबुली
राजकारण

होय, मी देवेंद्र फडणवीसांना भेटलो, अशोक चव्हाणांची कबुली

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. मात्र या भेटीत कुठल्याही राजकीय विषयांवर गप्पा झाल्या नसल्याचं स्पष्टीकरण चव्हाणांनी दिलं आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने दोघांची भेट झाल्याची माहिती आहे. फडणवीस आणि चव्हाण यांच्यात १५ ते २० मिनिटं वार्तालाप झाला. मुख्यमंत्री कार्यालयात समन्वयाची जबाबदारी सांभाळणारे भाजप नेते आशिष कुलकर्णी यांच्या घरी फडणवीस-चव्हाणांची भेट झाली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

काँग्रेसमधील काही आमदार फुटणार असून ते शिंदे गटात सामील होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. यात काही माजी मंत्र्यांचा समावेश असल्याचे बोलले जात होते. त्यातच चव्हाण आणि फडणवीस यांच्या भेटीच्या चर्चा रंगू लागल्या. मात्र माध्यमांनी यासंबंधी सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिल्यानंतर अवघ्या काही तासातच अशोक चव्हाण यांनी ही भेट झाल्यावर शिक्कामोर्तब केलं. मी देवेंद्र फडणवीसांना भेटलो, आमच्यात विविध विषयांवर गप्पा झाल्या, मात्र राजकीय चर्चा झाल्या नाहीत, असा दावा चव्हाणांनी केला. ‘टीव्ही9 मराठी’ वृत्तवाहिनीने यासंदर्भात बातमी दिली आहे.

आशिष कुलकर्णींच्या घरी भेट

भाजप नेते आशिष कुलकर्णी यांच्या घरी गणेश दर्शनाच्या निमित्ताने फडणवीस-चव्हाणांची भेट झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पारखलेला मोहरा अशी कुलकर्णींची ओळख होती. कॉंग्रेस नेते अध्यक्ष राहुल गांधी यांचे कोणे एके काळचे निकटवर्ती राहिलेले आशिष कुलकर्णी आता मुख्यमंत्री कार्यालयात रुजू झाले आहेत. सीएम एकनाथ शिंदे यांच्या समन्वयाची जबाबदारी कुलकर्णींवर सोपवण्यात आली आहे. शिवसेना ते कॉंग्रेस ते भाजप असा राजकीय प्रवास असलेले आशिष कुलकर्णी हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात.

शिंदे गट आणि भाजपमधील आमदार तसेच मंत्र्यांमध्ये सूसूत्रता राखणे, शिंदे गटातील आमदारांच्या समस्या सोडवणे यासारखी कामं कुलकर्णींकडे असतील. कुलकर्णी हे सध्या प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळतात. जून महिन्यात झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीतही कुलकर्णींनी मोठी जबाबदारी सांभाळल्याचं बोललं जातं.

काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर

महाराष्ट्रातील काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा गेल्या काही काळापासून आहे. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. त्याचवेळी पक्षातील काही आमदार नाराज असल्याचे समोर आले. विधापरिषद निवडणुकीपासूनच काँग्रेसमधील एक गट फुटणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.

अशोक चव्हाण हे बहुमत चाचणीच्या वेळी सभागृहात उशिरा पोहचले होते. त्यामुळे ते मतदान करू शकले नव्हते. त्यांच्यासोबत इतर 4 ते 5 आमदार बहुमत चाचणीपासून दूर राहिले होते. दरम्यान आमच्या पाठीशी असणाऱ्या अदृश्य हातांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात आभार मानले होते. पक्षविरोधी कार्यवाही केल्या प्रकरणी काँग्रेसने अशोक चव्हाण यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तेव्हापासून अशोक चव्हाण पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. पण या चर्चांना काही महत्त्व नाही. कोण करत आहे चर्चा, मी असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली होती.