भाजपची फजिती; तिकीट न मागताच दोघांना उमेदवारी
राजकारण

भाजपची फजिती; तिकीट न मागताच दोघांना उमेदवारी

कोलकाता : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने जाहीर केलेली उमेदवारी नाकारुन दोन उमेदवारांनी पक्षाची फजिती केली आहे. या प्रकरानंतर तृणमुल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना योग्य गृहपाठ करण्याचा सल्ला दिला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भाजपाने 157 उमेदवारांची यादी जाहीर केली. यापैकी दोघांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. चौरंगी विधानसभा मतदारसंघातून भाजपानं दिवगंत खासदार सोमन मित्रा यांच्या पत्नी शिखा मित्रा यांना उमेदवारी दिली. त्यांनी आपलं नाव हे मर्जीशिवाय पक्षानं जाहीर केल्याचा दावा केला आहे.

‘मी निवडणूक लढवणार नाही. माझ्या परवानगी शिवाय नावाची घोषणा केली आहे. मी भाजपमध्ये कधीही प्रवेश घेणार नाही. भाजपच्या यादीत माझं नाव कसं आलं हे मला माहिती नाही. मी काँग्रेसमध्ये आहे, आणि काँग्रेसलाच साथ देईन,’ असे शिखा मित्रा यांनी स्पष्ट केले. भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी शिखा आणि त्यांच्या मुलाची भेट घेतली होती. त्यानंतर त्याच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरु झाली होती. शिखा मित्रा यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. त्याचबरोबर तृणमूल काँग्रेसच्या आमदार माला साहा यांचे पती तरुण साहा यांना भाजपने काशीपूर-बेलगछिया मतदार संघातून तिकीट दिले होते. त्यांनी देखील उमेदवारी नाकारली आहे. याबाबत आपण भाजपला कल्पना दिली होती, असे तरुण यांनी स्पष्ट केले. भाजपकडून अजूनही त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.