संजय राठोडांच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांची प्रतिक्रिया
राजकारण

संजय राठोडांच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांची प्रतिक्रिया

मुंबई : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात वाढत्या दबावानंतर वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेत संजय राठोड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला. संजय राठोड पत्नी शीतल आणि मेहुणे सचिन नाईक यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर गेले होते. त्यानंतर वर्षा बंगल्यावरील घडामोडींकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

संजय राठोड पत्नी शीतल आणि मेहुणे सचिन नाईक यांच्यासह वर्षा बंगल्यावर गेले. राजीनामा देतो पण या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर त्याचा स्वीकार करावा अशी काहीशी भूमिका संजय राठोड यांनी घेतली होती. आपले मंत्रिपद टिकावं म्हणून संजय राठोड शेवटपर्यंत प्रयत्न करत होते. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री एकनाथ शिंदे यांची स्वतंत्र दालनात चर्चा झाली. संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यास एकनाथ शिंदे यांनी विरोध केला. राठोड यांनी पोहरादेवीच्या महंतांशी बोलण्याची विनंती केली, परंतु मुख्यमंत्र्यांनी चर्चेला नकार दिला. मला माझा निर्णय घ्यावा लागेल, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली.

दरम्यान संजय राठोडांच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेते आशिष शेलार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पूजा चव्हाण प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे. आम्ही त्याचं स्वागत करतो. पण केवळ राजीनामा दिला म्हणून चालणार नाही, याप्रकरणी पोलिसांनी फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. तसेच, केवळ राठोड यांच्या राजीनाम्याने चालणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करावीच लागेल. याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करावे लागतील. तरच पूजा चव्हाणची हत्या झाली की आत्महत्या झाली हे समजेल. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी लागेल, तसेच मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी राठोड यांच्यावर कारवाई करण्यात चालढकल का केली? असा सवाल शेलार यांनी केला आहे.

यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील राठोडांच्या राजीनाम्या वर प्रतिक्रिया दिली आहे. पहिल्याच दिवशी हे प्रकरण बाहेर आलं त्याच दिवशी राजीनामा यायला हवा होता. एवढे पुरावे असताना मंत्री म्हणून रहायला नको होतं. राजीनामा दिला खरं पण ते स्वीकारतील का नाही अजून माहित नाही, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वनमंत्री संजय राठोडांच्या राजीनाम्याविषयी साशंकता व्यक्त केली आहे. तसेच, संजय राठोड यांना वरिष्ठांचा आशीर्वीद असल्याचं वाटत असल्यानं राजीनामा द्यायला उशीर झाला. प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांवर काय कारवाई करणार आहेत? राजीनामा घेतला आहे पण एफआयआर दाखल झाला पाहिजे. बूंद से गयी वो हौदसे नही आती, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.