महाविकास आघाडी सरकारला सत्तेचा माज आणि मस्ती आली आहे; प्रवीण दरेकरांची टीका
राजकारण

महाविकास आघाडी सरकारला सत्तेचा माज आणि मस्ती आली आहे; प्रवीण दरेकरांची टीका

मुंबई : ”महाविकास आघाडी सरकारमध्ये संवेदना उरलेली नाही, सरकारला सत्तेचा माज आणि मस्ती आली आहे, असा आरोप करत आघाडीच्या एका आमदाराचा पर्दाफाश आम्ही करणार आहोत, असे म्हणत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यसरकारवर निशाणा साधला आहे. पूजा चव्हाण प्रकरणात वाढत्या दबावानंतर अखेर वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला. त्यानंतर आता पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी याबाबतची माहिती देताना महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.याबाबत बोलताना दरेकर म्हणाले की, ”महाविकास आघाडीच्या एका आमदाराची डीएनए टेस्ट करण्याची न्यायालयात मागणी आहे. या आमदाराची पत्नी आणि अपत्य बाहेर आहे. या आमदाराने त्याच्या मुलाला मारहाणही केली आहे. त्यामुळे या आमदाराची चौकशी करावी आणि त्याची डीएनए टेस्ट करावी, अशी मागणी सभागृहात करणार आहे, असे दरेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.

त्याचबरोबर यावेळी बोलताना प्रवीण दरेकरांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्यावरूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. राजीनाम्याचे केवळ नाटक सुरू आहे. या नाटकाचा हा पहिला अंक आहे की, दुसरा अंक आहे माहीत नाही, असा टोला दरेकर यांनी लगावला आहे. तर संजय राठोड मुख्यमंत्र्यांच्या हृदयात आहेत. त्यामुळेच त्यांचा राजीनामा राज्यपालांकडे अद्याप पाठवण्यात आलेला नाही, अशी टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.