मुख्यमंत्र्यांच्या टीकेला नारायण राणेंचा पलटवार; आज बाळासाहेब असते तर…
राजकारण

मुख्यमंत्र्यांच्या टीकेला नारायण राणेंचा पलटवार; आज बाळासाहेब असते तर…

मुंबई : ”आपण रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय स्वखर्चातून जनतेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी काढले आहे, सरकारी पैशातून नाही. श्रीयुत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात स्वखर्चाने एखादी बालवाडी तरी चालू करुन दाखवावी,” अशी खोचक टीका भाजपा खासदार नारायण राणे यांनी केली. टि्विट करत नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. शनिवारी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लघु पाटबंधारे योजना मसुरे-आंगणेवाडी, कोल्हापुरी पाटबंधारा योजना मालोड-मालडी (ता. मालवण) तसेच लघु पाटबंधारे योजना कुंभवडे (ता. कणकवली) या योजनांचे ऑनलाइन भूमीपूजन करण्यात आले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी दृक्श्राव्य माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधताना मेडिकल कॉलेजच्या मुद्द्यावरून भाजपा नेते नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला होता. ” तुम्ही रत्नागिरीसाठी सरकारी वैद्यकीय महाविद्यालय मागितले. तुम्ही स्वत:साठी काही मागू शकला असतात. मात्र, तसे केले नाहीत. काही जण असतात, इकडे तिकडे काही करून स्वत:साठी काही ना काही तरी मागतात. तुम्ही मात्र कोकणासाठी मागितले. याचा मला अभिमान वाटतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तुम्ही सच्चे शिवसैनिक आहात. त्यामुळेच तुम्ही स्वत:साठी काही मागितले नाही, अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती.

त्यानंतर नारायण राणेंनीही उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार करत खोचक टीका केली आहे. नारायण राणेंनी थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विधानाच्या माध्यमातूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. नारायण राणे यांच्या दैनिक ‘प्रहार’मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक किस्सा छापण्यात आला आहे. त्यामध्ये नारायण राणेंनी म्हटले आहे. “बाळासाहेब, आपण व्यंगचित्र करण्याचे काम कमी केलेत. या प्रश्नास उत्तर देताना बाळासाहेब खंत व्यक्त करत म्हणत, व्यंगचित्र काढण्यासारखे चेहरे राहिले नाहीत. त्या उंचीचे व्यक्तिमत्त्व नजरेस पडत नाही. दर्जेदार विषय गवसत नाहीत. विकृत आणि विदूषक कमी झाले. आज बाळासाहेब असते तर… उत्सुफूर्तपणे कुंचला उचलला असता अन् दिवसागणिक शेकडो व्यंगचित्रं केली असती… अब तो एक ढुंढो हजार मिलते है, और तो घर में ही दो दो बसते है’, असे म्हणत नारायण राणेंनी अशी खोचक टीका नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे.

याचबरोबर, बाळासाहेब ठाकरे यांचा व्यंगचित्रं काढतानाचा फोटो छापण्यात आला आहे. त्यावर ‘अब तो एक ढुंढो हजार मिलते है’, असे लिहिले आहे. फोटोला ‘आज बाळासाहेब असते तर…’ अशी कॅप्शन दिली आहे आणि सर्वात शेवटी ‘खा. नारायण राणे यांच्या संग्रहातून’ असे म्हटले आहे.