राष्ट्रवादीच्या नेत्याला कोरोनाची लागण; शरद पवारांसोबत लग्नात होते उपस्थित
राजकारण

राष्ट्रवादीच्या नेत्याला कोरोनाची लागण; शरद पवारांसोबत लग्नात होते उपस्थित

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते आणि अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, राजेश टोपे आणि एकनाथ खडसे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात एकीकडे कोरोना संकटाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढील आठ दिवस परिस्थिती पाहून लॉकडाउनचा निर्णय घेणार असल्याचं जाहीर केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

छगन भुजबळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, “माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी. माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी”.

विशेष बाब म्हणजे मंत्री भुजबळ यांनी नुकतीच आमदार सरोज अहिरे यांच्या लग्नाला हजेरी लावली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारदेखील उपस्थित होते. त्यामुळे नेत्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर राष्ट्रवादीकडून नेत्यांचे जनता दरबार रद्द करण्यात आले आहेत. शरद पवार आणि भुजबळ एकाच मंचावर उपस्थित राहिल्याने आता शरद पवारांचीदेखील करोना चाचणी केली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, नुकतंच विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांचे प्रश्न सोडवण्यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी आयोजित केलेला जनता दरबार रद्द करण्यात आला आहे. कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले.