आजी-माजी मुख्यमंत्र्यांसह पवार आणि राज एकाच मंचावर
राजकारण

आजी-माजी मुख्यमंत्र्यांसह पवार आणि राज एकाच मंचावर

मुंबई : राज्याच्या राजकारणातील चार महत्त्वाचे नेते आज एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्यामुळे काय राजकीय जुगलबंदी रंगणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे लोकापर्ण शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्त आज (२३ जानेवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री आदित्य ठाकरे व अस्लम शेख, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आदी महत्वाचे नेतेही कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. शिवसेनाप्रमुखांचा मुंबईत उभारला जाणारा हा पहिलाच भव्य पुतळा ठरणार आहे.

कसा असेल बाळासाहेबांचा पुतळा?
नऊ फूट उंच व १२०० किलो ब्राँझ धातूपासून या पुतळ्याची निर्मिती करण्यात आली आहे. हा पुतळा दोन फूट उंच हिरवळीसह सुमारे १४ फूट उंचीच्या चौथऱ्यावर हा पुतळा बसवण्यात आला आहे. प्रबोधन प्रकाशनाच्या वतीने या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. ज्येष्ठ शिल्पकार शशिकांत वडके यांनी हा पुतळा साकार केला. या सोहळ्याचे ऑनलाइन प्रेक्षपण केले जाणार आहे.