जर, केंद्राकडून लस विनामुल्य मिळाली नाही तर आम्ही मोफत लस देऊ : मुख्यमंत्री
राजकारण

जर, केंद्राकडून लस विनामुल्य मिळाली नाही तर आम्ही मोफत लस देऊ : मुख्यमंत्री

नवी दिल्ली : येत्या १६ जानेवारी २०२१ पासून कोरोनाविरूद्ध लसीकरण मोहिमेचा पहिला टप्पा देशभरात सुरु होणार आहे. या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि फ्रंटलाइन कामगारांना लस देण्यात येणार आहे. दरम्यान, जर केंद्राकडून ही लस विनामूल्य मिळाली नाही तर आम्ही मोफत लस देऊ. असे विधान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

याबाबत बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले, “ही महामारी 100 वर्षांत प्रथमच आली आहे. अशातच आपला देशही अत्यंत गरीब आहे. त्यामुळे देशात असे अनेक लोक आहेत ज्यांना ही लस परवडणार नाही. माझं केंद्राला आवाहन आहे, की “ही लस देशभरात विनामूल्य उपलब्ध करुन द्यायला हवी. यावर केंद्र काय निर्णय घेतंय हे आम्ही पाहणार आहे. जर केंद्र सरकाराने दिल्लीतील लोकांना मोफत लस देण्यास नकार दिला तर आम्ही दिल्लीच्या लोकांना विनामूल्य उपलब्ध करुन देऊ.” असे महत्त्वपूर्ण विधान अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरंसिंग च्या माध्यमातून 16 जानेवारीपासून देशभरात कोरोना लसीकरण मोहीमेला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना लस देशभरात पोहोचवण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. सीरम इन्स्टिट्युटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन या लसींना सध्या मंजुरी देण्यात आली आहे.

सीरम संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पूनावाला म्हणाले की, ऑक्सफोर्ड-एस्ट्रेजेनेका लसीच्या खाजगी बाजारात कोविशिल्ड लसीची किंमत प्रति डोस 1000 रुपये असेल. ते म्हणाले, “आम्ही सरकारला प्रति डोस 200 रुपये विशेष दराने लस दिली आहे, जे सुरुवातीच्या 10 कोटी डोससाठीचे दर असेल. परंतु, खाजगी बाजारपेठेत आम्ही ही लस प्रतिडोस 1000 रुपये दराने देऊ. भारत सरकारकडून या लसींच्या किंमतींबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.