शिवजयंतीवरुन कोणीही भावनिक राजकारण करू नये: अजित पवार
राजकारण

शिवजयंतीवरुन कोणीही भावनिक राजकारण करू नये: अजित पवार

औरंगाबाद : “शिवजयंतीवरुन काही जण नाहक राजकारण करत आहेत. शिवजयंतीला बंधन का आणता?, अशी टीका केली गेली. पण कोरोना वाढतो आहे. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. या विषयावर राजकारण करून लोकांना कुणीही भावनिक करू नये,” असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. ते औरंगाबादमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान, सरकारने शिवसजयंती साध्या पणाने साजरी करण्याचे आवाहन केल्यानंतर भाजपाने सरकारच्या या निर्णयाचा कडाडून विरोध केला. ” हे सरकार पेंग्विन पाहायला लोकांना आमंत्रण देते, पण शिवजयंतीसाठी एकत्र जमण्याला सरकार परवानगी देत नाही, असा सणसणी टोला, भाजपचे नेते आषिश शेलार यांनी ट्विटद्वारे लगावला होता. या संदर्भात त्यांनी 12 फेब्रुवारी रोजी ट्विट केले होते.

या टीकेला उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, “कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन राज्य सरकारने शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी सरकारने काही निर्बंधासोबतच मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. या विषयावर राजकारण करून लोकांना कुणीही भावनिक करू नये. तसेच, कुणीही मास्क घालत नाही हे अत्यंत घातक आहे. याची आपल्याला मोठी किंमत चुकवावी लागणार आहे.” असेही त्यांनी म्हंटले आहे. त्याचबरोबर, कोरोनावर कोणीही राजकारण करू नये, असंही अजित पवार म्हणालेत.

तसेच, अजित पवार उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार असून, या बैठकीत कोरोनासंदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. ग्रामस्थ आणि नागरिक मास्क वापरत नाहीत. त्यामुळे उद्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत कोरोनासंदर्भात कठोर निर्णय कदाचित घ्यावे लागतील, असा इशाराही अजित पवारांनी दिलाय. कोरोना पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांना नियमावली लावली पाहिजे, मी मुंबईला गेल्यानंतर राज्य प्रमुखांशी बोलून तातडीने निर्णय घेऊ. असंही अजित पवारांनी सांगितलंय.

दरम्यान, शिवजंयती संदर्भात भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सामंजस्याची भूमिका घेतली आहे. शिवाजी महाराज असते तर त्यांनीसुद्धा हाच निर्णय घेतला असता. त्यांनीसुद्धा नजतेच्या रक्षणालाच प्राधान्य दिले असते, असे वक्तव्य केले.