साहेबांना शपथही घेता आली नव्हती; गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीत पंकजा भावुक!
राजकारण

साहेबांना शपथही घेता आली नव्हती; गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीत पंकजा भावुक!

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर महाराष्ट्रात मुंडे भगिनी नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मात्र, नाराजी नसल्याचं स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिलं आहे. मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्या या सर्व मुद्द्यांवर बाजू मांडत होत्या. मात्र, यावेळी बोलताना दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीने त्या भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. खासदारकी किंवा मंत्रिपदाविषयी बोलताना त्यांचा गळा गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीने दाटून आला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

२०१४मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश मिळालं. मात्र, खासदारकीची शपथ घेण्याआधीच त्यांचं अपघाती निधन झालं. याविषयी बोलताना देखील पंकजा मुंडेंना गहिवर अनावर झाला. मुंडे साहेबांना शपथही घेता आली नाही. ते निवडून आले आणि ३ जूनला ते गेले. गंमतीचा भाग असा आहे की माझ्या आईला पेन्शन मिळते. पण मुंडे साहेबांच्या शेवटच्या टर्मची मिळत नाही. कारण त्यांनी खासदारकीची शपथ घेतली नव्हती. ते शपथ घेण्याआधीच गेले. १७ दिवसांत ते गेले. हे केवढं मोठं घोर दु:ख आहे. प्रीतम मुंडे राजकारणात मिरवण्यासाठी नाही आल्या. त्या लोकांना शांत करण्यासाठी आल्या, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

बाहेरून पक्षात आलेल्या व्यक्तींना मंत्रीपद मिळाल्याची देखील चर्चा सुरू असताना पंकजा मुंडे यांनी त्याचं समर्थन केलं आहे. आम्ही जे कष्ट केलेत ते पक्षासाठीच केले. माझ्याकडे येणारी गर्दी पक्षासाठीच आहे. त्यामुळे मी वेगळी आहे आणि पक्ष वेगळा आहे असं मी म्हणून शकत नाही. मंत्रीपद मिळालेल्या लोकांमुळे भाजपमध्ये १ मतही वाढत असेल, तर त्यांचं स्वागतच आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.