राष्ट्रवादीचा शिवसेनेला धक्का; प्रमुख कार्यकर्त्यांसह नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
राजकारण

राष्ट्रवादीचा शिवसेनेला धक्का; प्रमुख कार्यकर्त्यांसह नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

बीड : बीडमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला असून शिवसेनेचे युवा नेते, तथा पटेल फाउंडेशनचे अध्यक्ष शाहिद पटेल यांनी प्रमुख कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला आहे. बीड नगरपालिका निवडणूक तोंडावर आली असतानाच शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर आणि राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर या काका-पुतण्यात रस्सीखेच सुरू झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पटेल फाउंडेशनचे शाहीद पटेल यांनी जयदत्त क्षीरसागर यांना सोडचिठ्ठी देऊन संदीप क्षीरसागर यांच्याशी हातमिळवणी केल्यामुळे बीडमध्ये शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वात आज शाहीद पटेल यांनी राष्ट्रवादी भवन येथे पक्षात जाहीर प्रवेश केला. बीडमधील पटेल फाउंडेशन हे सामाजिक संघटन आहे. फाउंडेशनचे जिल्ह्यात मोठे नेटवर्क आहे. अनेक ग्रामपंचायत सदस्य देखील पटेल यांच्याकडे आहेत. यामुळे शाहीद पटेल यांचं चांगलं वजन आहे. शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर यांचे खंदे समर्थक म्हणून शाहीद पटेल यांची जिल्ह्यात ओळख आहे.

पटेल यांच्या प्रवेशामुळे येत्या नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला चांगलाच फायदा होईल अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. यातच संदीप क्षीरसागर यांचे आठ नगरसेवकांनी काका नगराध्यक्ष डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला होता. यानंतर आता शाहीद पटेल यांनी राष्ट्रवादी प्रवेश केल्याने पुतण्याने आता काकावर कुरघोडी केली, अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.