नारायण राणेंच्या राजीनाम्याच्या मागणीची पंतप्रधान कार्यालयानं घेतली दखल
राजकारण

नारायण राणेंच्या राजीनाम्याच्या मागणीची पंतप्रधान कार्यालयानं घेतली दखल

नवी दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानाप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणेंनी नैतिकता राखून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती. त्यानंतर राजीनाम्याच्या मागणीची दखल पंतप्रधान कार्यालयाने दहा मिनीटात घेतली असल्याचे विनायक राऊत यांनी म्हटले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राऊत म्हणाले, केंद्रीय मंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीचं वर्तन मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निदर्शनास आणून दिलं. मला अभिमान वाटतो, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवघ्या दहा मिनिटात त्या पत्राची दखल घेतली. दुपारी त्यांच्या कार्यालयातून मला फोन आला आणि मला सांगितलं पंतप्रधान बैठकीत व्यस्त आहेत. तुम्ही गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोला, तुमचं तक्रारपत्र मी अमित शाह यांच्याकडे पाठवलं आहे. नारायण राणे यांनी जनाची नाही, तर मनाची लाज राखून ताबडतोब केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, असं राऊत यांनी पुढे सांगितलं आहे.

अटक करताना पोलिसांवर कोणताही दबाव नव्हता. पोलीस कायद्याचे रक्षणकर्ते आहेत. त्यांनी कायद्याचं रक्षण केलं आहे. वातावरण चिघळण्याची शक्यता नाही. ज्यांनी जसं करावं तसं भरावं. वातावरण चिघळण्याची सुरुवातच नारायण राणे यांनी केलेली आहे. त्यांना अटक करण्याची आवश्यकता होती. वातावरण चिघळलं तर ती जबाबदारी भाजपाची असेल. मी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करेन, त्यांनी राणेंच्या वक्तव्याचं समर्थन केलं नाही, असेही राऊत म्हणाले आहेत.