रेकॉर्डवर सांगतोय, मराठा आरक्षण देताना इतरांना धक्का लावणार नाही : उद्धव ठाकरे
राजकारण

रेकॉर्डवर सांगतोय, मराठा आरक्षण देताना इतरांना धक्का लावणार नाही : उद्धव ठाकरे

मुंबई :  “रेकॉर्डवर सांगतोय, मराठा आरक्षण देताना इतरांना धक्का लावणार नाही, मराठा आरक्षण लढाई अंतिम टप्प्यात आहे, ही लढाई आम्ही जिंकणारच”, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत दिली. हिवाळी अधिवेशनाच्या वेळी आजही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खंडाजागी पाहायला मिळाली. विरोधकांनी मराठा आरक्षण आणि अभिनेत्री कंगना रानौत, अर्णब गोस्वामी प्रकरणावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना तसेच सडेतोड उत्तर दिले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ”मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात वकिलांची फौज जशीच्या तशी आहे, भूमिकेत बदल नाही, काहीही बदललेलं नाही. ही लढाई लढत असताना मध्येच कुणी टुमणं काढलं इतर समाजाचं आरक्षण काढणार का, असे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. पण मी सभागृहात ग्वाही देतो, मराठा आरक्षण देताना अन्य कुणाचं आरक्षण काढणार नाही. हे रेकॉर्डवर आहे, समाजात जे कोणी आग लावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यावर पाणी टाकावं लागेल. मी मुख्यमंत्री म्हणून जबाबदारीने बोलतोय, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

विरोधकांच्या सर्वच आरोपांना उत्तर देण्याची गरज वाटत नाही, माझ्या सहकारी मंत्र्यांनी उत्तर दिलं आहे, तुम्ही मानगुटीवरच बसायचा प्रयत्न करत असाल तर आम्ही काहीही करू शकणार नाही. फडणवीस दिल्लीत जावेत ही तर मुनगंटीवारांची इच्छा, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला. तसेच, ही लढाई लढत असताना इतर समाजच आरक्षण कमी करणार का अशी चर्चा सुरू झाली, पण मराठा समाजाला आरक्षण देत असताना कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू देणार नाही. मागील काळात अनेक जण कुंडल्या काढत होते, आता ते पुस्तक वाचू लागले. अहवाल वाचू लागले आहेत, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी जाहीर झाली झाल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. या आरोपाचाही मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला आहे. “महाराष्ट्रात काही सरकारविरोधात काही बोललं तर तुरुंगात टाकलं जातं, महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी आहे असा आरोप आमच्यावर झाला. मग ईडी आणि इतर तपास यंत्रणांचा वापर तुम्ही कसा करत आहात? प्रताप सरनाईकांच्या मागे ईडीचा ससेमिरा लावला. त्यांच्या मुलांचीही चौकशी केली. नशीब त्याला नातू झालेला नाही नाहीतर त्याच्याही मागे ईडी चौकशी लावली असती. या. हे सगळं काय आहे? ही विकृतीच आहे. असं विकृत राजकारण आम्ही करत नाही” असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं आहे.