मुनगंटीवारांचं भाषण पाहताना ‘नटसम्राट’ पाहात असल्याचा भास झाला; मुख्यमंत्री ठाकरेंचा टोला
राजकारण

मुनगंटीवारांचं भाषण पाहताना ‘नटसम्राट’ पाहात असल्याचा भास झाला; मुख्यमंत्री ठाकरेंचा टोला

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये भाजपानं राज्य सरकारवर अनेक मुद्द्यांवर टीका केली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांपासून भाजपाच्या अनेक नेतेमंडळींनी सरकारच्या धोरणांवर तोंडसुख घेतलं. त्यापैकी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर अनेक मुद्द्यांवरून आगपाखड केली. मात्र, यानंतर विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना खोचक टोमणे मारले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यामध्ये “सुधीर मुनगंटीवारांचं भाषण पाहताना ‘नटसम्राट’ पाहात असल्याचा भास झाला”, असं म्हणत त्यांनी मुनगंटीवारांना देखील कोपरखळी मारली. ”आमच्याकडे प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे आणि आमच्या प्रत्येक कृतीला काही ना काही आधार आहे. माझी अपेक्षा अशी होती की निदान मी उत्तर देताना ज्यांनी ज्यांनी प्रश्न विचारले, ते हजर राहिले असते तर बरं झालं असतं. असं मुख्यमंत्री म्हणाले, तेवढ्यात सुधीर मुनगंटीवार सभागृहात आले. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी “व्हेरी गुड”, अशी त्यावर खोचक प्रतिक्रिया दिली.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, मुनगंटीवारांच्या भाषणादरम्यान नटसम्राटमधील मी अथ्थेलो, मी आहे हॅम्लेट असा भास झाला. पण शेवटी कुणी किंमत देतं का किंमत अशी स्थिती झाली. सुधीरभाऊ काय तुमचा वेश, काय तुमचा आवेश.. देवेंद्रजींना भिती वाटायला लागली की आमचं कसं होणार? कारण ज्या तडफेने तुम्ही बोलत होता, ते छान होतं”, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

इतकेच नव्हे तर, मी आणि मुनगंटीवार हाडाचे कलाकार आहोत. पण कलेला राजकारणात वाव नाही. मात्र, मुनगंटीवार यांना संधी मिळाली की त्यांची कला उफाळून येते. पण सुधीरभाऊ तुमच्यातला कलाकार मारु नका, अशा खोचक सल्लाही मुख्यमंत्र्यांनी मुनगंटीवारांना दिला आहे.

दरम्यान, औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी संभाजीनगरच्या मुद्द्यावरुन शिवसेनेवर आणि पर्यायानं मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. त्याला आज मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करु, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केलाय. पण राज्यानं ज्या विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्याचा निर्णय घेतला, तो प्रस्ताव सध्या कुठे रखडला आहे? असा सवालही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलाय.

इतकच नाही तर जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव दिल्यावरुनही मुख्यमंत्र्यांनी भाजपवर शरसंधान साधलं. वल्लभाई पटेल यांचं नाव हटवून नरेंद्र मोदींचं नाव त्या स्टेडियमला दिलं आहे. आता त्या स्टेडियमवर भारत प्रत्येक मॅच जिंकणार, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.