बिगर भाजप आघाडीच्या नेतेपदाबाबत पवारांची भन्नाट प्रतिक्रिया
राजकारण

बिगर भाजप आघाडीच्या नेतेपदाबाबत पवारांची भन्नाट प्रतिक्रिया

पुणे : राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवारांच्या दिल्ली निवासस्थानी झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. या बैठकीला काँग्रेसची असलेली अनुपस्थिती देखील अनेकांना खटकली. त्यातून राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लढवले गेले. विशेषत: काँग्रेसला टाळून शरद पवार बिगर भाजप पक्षांची मोट बांधत असल्याची चर्चा रंगली. या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यामध्ये एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्रकारांनी संभाव्य बिगर भाजप आघाडीविषयी आणि त्याच्या अध्यक्ष पदाविषयी प्रश्न विचारला असता पवारांनी त्यावर भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पत्रकारांनी बिगर भाजप आघाडीचं सामुदायिक नेतृत्व शरद पवारांकडे असेल अशी चर्चा सुरू असल्याबाबत विचारणा केली. त्यावर बोलताना, आघाडीची चर्चाच केली नसल्यामुळे नेतृत्वावरही चर्चा केलेली नाही. पण सामुदायिक नेतृत्व हेच सूत्र पुढे ठेऊन आम्हाला पुढे जावं लागेल. मी फार वर्ष असले उद्योग केले आहेत. त्यामुळे सध्या यामध्ये पडायचं नाही. त्यांना मार्गदर्शन करणं, शक्ती देणं, मदत करणं, त्यांना एकसंध ठेवण्यासाठी प्रयत्न करणार, असं शरद पवारांनी यावेळी स्पष्ट केलं.

२२ जून रोजी झालेल्या या बैठकीमध्ये राष्ट्रीय पातळीवरच्या अनेक पक्षांचे नेते उपस्थित होते. मात्र, या बैठकीत बिगर भाजप आघाडीची चर्चा झाली नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजिद मेमन यांनी सांगितलं. आज देशात जे राजकीय, आर्थिक व सामाजिक वातावरण बनलं आहे, त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी राष्ट्रमंचाची काय भूमिका असेल. यावर सर्वांचे मत घेण्यात आलं आहे. यामध्ये काही अराजकीय व्यक्ती देखील सहभागी होते. जावेद अख्तर, न्यायमूर्ती एपी शहा यांनी देखील आपलं मत मांडलं. म्हणून हा काही राजकीय कार्यक्रम नव्हता. ज्याचा चुकीच्या पद्धतीने प्रचार करणं उचित ठरणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.