या देशात नवी जमात उदयाला आली आहे ती म्हणजे आंदोलनजीवी : नरेंद्र मोदी
राजकारण

या देशात नवी जमात उदयाला आली आहे ती म्हणजे आंदोलनजीवी : नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : “श्रमजीवी, बुद्धिजीवी यांसारखे शब्द आपल्या खूपच परिचयाचे आहेत. मात्र, मी पाहतोय गेल्या काही दिवसांपासून या देशात नवी जमात उदयाला आली आहे ती म्हणजे आंदोलनजीवी. वकिलांचं, विद्यार्थ्यांचं, कामगारांचं कुणाचंही आंदोलन असेल हे आंदोलनजीवी सर्व ठिकाणी उपस्थित असतात. हे कधी पडद्यामागे तर कधी पडद्याच्या पुढेही असतात. यांची एक टोळी आहे. हे लोक आंदोलनांशिवाय जगू शकत नाहीत तसेच आंदोलनासोबत जगण्यासाठी ते मार्ग शोधत असतात, आपल्याला अशा लोकाना ओळखायला हवं.” असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलनांमध्ये सहभाग नोंदवणाऱ्या नेत्यांवर, राजकीय पक्षांवर टीका केलील आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान, केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात राजधानी दिल्लीच्या वेशीवर गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन सुरु आहे. देशभरातून कृषी कायद्यांना विरोध होत असून शेतकऱ्यांसह विरोधकांकडूनही हे कायदे रद्द करण्याची मागणी केली जात आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विविध आंदोलनांना पाठिंबा दर्शवणाऱ्या आणि आंदोलनांमध्ये सहभाग नोंदवणाऱ्या नेत्यांवर, राजकीय पक्षांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सडकून टीका केली आहे. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना ते बोलत होते.

हे लोक सर्व ठिकाणी जाऊन वैचारिक भूमिका मांडत असतात, लोकांची दिशाभूल करण्याचं काम करत असतात. नवनव्या गोष्टी सांगत असतात. त्यामुळे देशानं अशा आंदोलनजीवी लोकांपासून सावध रहायला हवं. त्यांना स्वतःला नीट उभं राहता येत नाही ते दुसऱ्याच्या आंदोलनात जाऊन बसतात, हीच त्यांची ताकद आहे. हे सर्व आंदोलनजीवी परजीवी असतात. आपण जिथे जिथे सरकार चालवत असाल तुम्हाला अशा परजीवी आंदोलनकर्त्यांचा अनुभव येतच असेल, अशा शब्दांत मोदींनी विविध आंदोलनांना पाठिंबा दर्शवणाऱ्यांना सुनावले आहे.

त्याचबरोबर, “सभागृहात शेतकरी आंदोलनाची भरपूर चर्चा झाली. जास्तीत जास्त वेळ जे मुद्दे मांडले गेले, ते आंदोलनासंदर्भातले आहेत. पण, कोणत्या गोष्टीसाठी आंदोलन आहे, यावर मात्र सगळे गप्प आहेत. आंदोलन कसं आहे. आंदोलकांसोबत काय होतंय. पण, मूळ मुद्द्यांवर चर्चा झाली असती, तर चांगलं झालं असतं. कृषीमंत्र्यांनी काही प्रश्न विचारले, त्या प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीत, याची मला खात्री आहे,” अशी टोला मोदींनी विरोधकांना लगावला.